

Sri Lanka Nursing Home Fire Cylinder Blast: श्रीलंकेतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. कोलंबोपासून साधारण 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या कलुतारा जिल्ह्यातील अंगुरुवाटोटा येथील 'मावपिया सेवाना' या वृद्धाश्रमाला बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत 11 वृद्ध नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य 7 जण गंभीररित्या भाजले. आगीचा तांडव इतका भयानक होता की, वृद्धाश्रमाच्या आवारातच 10 जणांचे मृतदेह आढळून आले, तर एका वृद्धाने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
प्राथमिक माहितीनुसार, वृद्धाश्रमात झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली. विशेष म्हणजे, आगीने काही वेळातच संपूर्ण इमारतीला आपल्या विळख्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी जीवाची बाजी लावून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे या आगीतून तब्बल 51 वृद्धांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. या बचावलेल्या नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात जवळच्याच एका शाळेमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांना सुरक्षित स्थानी हलवण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दंडाधिकारी तपासाचे आदेश देण्यात आले.
दुसरीकडे, भारताची राजधानी दिल्लीत बुधवारीच एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांमध्ये बहुतांश परदेशी नागरिकांचा समावेश होता. दिल्लीतील या अग्निकांडात मोठ्या संख्येने लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत.
त्याचवेळी, बिहारमधील (Bihar) मुजफ्फरपूर येथूनही अशीच एक चिंताजनक घटना समोर आली. मुजफ्फरपूर येथील एका नामांकित रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे 4 रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले. एकाच दिवशी श्रीलंका, दिल्ली आणि बिहारमध्ये घडलेल्या या तीन वेगवेगळ्या अग्निकांडांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर आणि आग प्रतिबंधक उपाययोजनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.