

Sri Lanka Easter Sunday Bombing Court Verdict: आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या श्रीलंकेतील 2019 मधील ईस्टर साखळी आत्मघाती बॉम्बस्फोट प्रकरणावर अखेर श्रीलंकन न्यायालयाने एक अत्यंत कठोर निर्णय दिला. कोलंबो हायकोर्टाच्या एका विशेष तीन सदस्यीय खंडपीठाने या भीषण दहशतवादी हल्ल्या प्रकरणातील 24 आरोपींपैकी 15 जणांना दोषी ठरवत प्रत्येक दोषीला तब्बल 220 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
या भीषण हल्ल्यामध्ये 11 भारतीय नागरिकांसह तब्बल 270 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला होता, तर 500 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या स्थानिक 'नॅशनल तौहीद जमात' या दहशतवादी संघटनेच्या 9 हल्लेखोरांनी 21 एप्रिल 2019 रोजी श्रीलंकेतील 3 कॅथलिक चर्च आणि 3 लक्झरी हॉटेल्सना लक्ष करुन हे साखळी स्फोट घडवून आणले होते.
'अदादेराना' या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, कोलंबो हायकोर्टाच्या न्यायमूर्ती नवरत्ने मारासिंघे, न्यायमूर्ती रामनाथन कन्नन आणि न्यायमूर्ती सुजीवा निसांका या तीन सदस्यीय न्यायमूर्तींच्या खंडपीठाने प्रदिर्घ सुनावणीनंतर हा निकाल दिला. न्यायालयाने 15 जणांना दोषी ठरवून प्रत्येकी 220 वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेची घोषणा केली, तर पुराव्यांच्या अभावी उर्वरित 9 जणांना निर्दोष मुक्त केले. या खटल्याची सुनावणी सलग 5 वर्षे अत्यंत बारकाईने चालली, ज्यामध्ये मुख्य आरोपी नौफर मौलवी यालाही दोषी ठरवण्यात आले.
आरोपींविरुद्ध तब्बल 23 हजार 270 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, तर अभियोजन पक्षाच्या वतीने तब्बल 2 हजार 309 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले होते, जो श्रीलंकन न्यायसंस्थेच्या इतिहासातील एक विक्रम मानला जात आहे.
दहशतवाद प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत या सर्व आरोपींवर हत्या, हत्येचा प्रयत्न, दहशतवादी कृत्यांची गंभीर कटकारस्थाने रचणे, तसेच मोठ्या प्रमाणावर प्राणघातक शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा बाळगणे आणि त्यांचा वापर केल्याचे अनेक गुन्हे सिद्ध झाले होते. 'नॅशनल तौहीद जमात'चा कुख्यात नेता जहारान हाशिम याने या संपूर्ण हल्ल्याचे नेतृत्व केले होते, ज्याने ईस्टर संडेच्या विशेष प्रार्थनेदरम्यान चर्चमध्ये रक्तपात घडवून आणला होता.
या भयंकर हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या (Sri Lanka) राजकारणात मोठा भूकंप झाला होता, कारण तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारवर आधीच गुप्तचर यंत्रणांचे इनपुट असूनही हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर युएईमधून 5 प्रमुख संशयितांना श्रीलंकेत परत आणून कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली होती, आणि आता न्यायालयाच्या या कठोर निकालानंतर पीडित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.