सुदानमध्ये (Sudan) मागील काही दिवसांपासून लष्करी आणि नागरी सत्तेचा संघर्ष सुरु झाला यातच आता सुदानमध्ये लष्कराने सत्तापालट करत लष्करप्रमुखांनी (Chief of Army Staff) देशात आणीबाणी जाहीर केली आहे. या सत्तापालटानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली आहेत. विरोध वाढत असल्याचे पाहून सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला ज्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 140 जण जखमी झाले आहेत.
सुदानचे सैन्य जनरल अब्देल-फताह बुरहान (Abdel-Fatah Burhan) यांनी घोषित केले की, देशाची सत्ताधारी सार्वभौम परिषद विसर्जित केली जात आहे. त्याचबरोबर पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक (Abdullah Hamdok) यांच्या नेतृत्वाखालील सरकारही बरखास्त करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, राजकीय गटांमधील संघर्ष पाहता लष्कराने सत्तेचा लगाम स्वत:च्या हातात घेतला आहे. आम्ही लोकशाही सरकार बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करु. निवडणुका होईपर्यंत आमचे नवीन टेक्नोक्रॅट सरकार असेल.
लोकशाही फक्त दोन वर्षे टिकली
सुदानमधील सत्तापालट हा या देशाला मोठा धक्का आहे. 1956 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत आठवेळा सत्तापालट झाला आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी, 2019 मध्ये या देशाचे दिर्घकाळ शासक ओमर-अल-बशीर (Omar-al-Bashir) यांना लोकांनी निदर्शने करुन हटवून सुदानमध्ये लोकशाही प्रस्थापित केली होती. परंतु आता अवघ्या दोन वर्षांनी पुन्हा लष्करी राजवटीला सुदान सामोरे जात आहे. 75 वर्षीय लष्करी शासक उमर-अल-बशीर यांना आर्थिक दुर्दशेमुळे जनतेने सत्तेवरुन हटवले.
सुदानच्या माहिती मंत्रालयाने, जे अद्याप पदच्युत पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांच्याशी एकनिष्ठ आहे. त्यांच्या फेसबुक संदेशाच्या माध्यमातून म्हटले होते की, आपत्कालीन काळात आणिबाणी घोषित करण्याचा अधिकार घटना केवळ पंतप्रधानांना आहे.
संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने नाराजी व्यक्त केली
दुसरीकडे सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेने या सत्तापालटावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकशाही व्यवस्था कमकुवत झाल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. याशिवाय, सुदानमधील सत्तापालटावर अमेरिकेसह युरोपियन युनियननेही चिंता व्यक्त केली आहे. युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख जोसेफ बोरेल यांनी ट्विट करत म्हटले की, ईशान्य आफ्रिकन देशात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल संवेदना आहे. त्याच वेळी आफ्रिकेतील अमेरिकेचे राजदूत जेफ्री फेल्टमन म्हणाले की, आम्ही सुदानमधील बदलांवर लक्ष ठेवून आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.