

Riyadh Airport Missile Attack Video: सौदी अरेबियाची राजधानी रियाद येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हूती बंडखोरांनी केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठी जीवितहानी झाली. सौदी सरकारी टेलिव्हिजनने प्रसारित केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत क्षेपणास्त्र कोसळताच आगीचे लोळ उठताना स्पष्टपणे दिसत आहे. या महाभयंकर हल्ल्यानंतर टर्मिनलच्या छताचा मोठा भाग कोसळला, ज्यामुळे मक्का आणि मदिनेच्या प्रवासाला निघालेल्या यात्रेकरुंमध्ये घबराट पसरली.
या अत्यंत हिंसक हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये हैदराबाद येथील एका नागरिकाचाही समावेश आहे. हा भारतीय नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत मदिनेला जात असताना या भीषण हल्ल्याचा बळी ठरला. अधिकृत अहवालांनुसार, या हल्ल्यात 380 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले.
या हल्ल्याची जबाबदारी इराण समर्थित येमेनच्या हूती विद्रोही गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी स्वीकारली. हूती गटाने दावा केला की, त्यांनी केवळ रियाद विमानतळच नव्हे, तर सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतातील दम्मम विमानतळ आणि सौदीच्या ‘सऊदी अरामको’ या जागतिक तेल कंपनीच्या दोन प्रमुख ठिकाणांनाही लक्ष्य केले. रविवारी सुद्धा हे हल्ले थांबलेले नसून या आठवड्यात रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्यांमध्ये मृतांचा आकडा वाढून 18 वर पोहोचला.
या भयानक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौदी एअर डिफेन्स सिस्टीमने पूर्व प्रांतावर झेपावणारा एक ड्रोन आणि खमीस मुशायतच्या दिशेने सरकणारे एक बॅलिस्टिक मिसाइल हवेतच नष्ट केले. तसेच, देशातील अनेक भागात इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला. दुसरीकडे, हूती बंडखोरांनी आरोप केला की सौदीने गेल्या 24 तासांत येमेनवर तब्बल 124 हवाई हल्ले केले. जोवर सौदी अरेबिया आपली लष्करी कारवाई थांबवत नाही, तोवर सौदी विमानतळांवर अशा प्रकारचे क्षेपणास्त्र हल्ले सुरुच राहतील, अशी उघड धमकीही त्यांनी दिली.
सतत बिघडत चाललेल्या सुरक्षेच्या स्थितीमुळे सौदी प्रशासनाने रियादमधील (Riyadh) सर्व शाळांमध्ये रविवारपासून गुरुवारपर्यंत ऑनलाइन वर्ग घेण्याचे कठोर आदेश जारी केले आहेत. तसेच, ब्रिटनच्या दूतावासाने आपल्या नागरिकांना मदिना विमानतळ वगळता जेद्दाह, दम्मम आणि रियादसह संपूर्ण सौदी अरेबियामध्ये विनाकारण प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. याशिवाय, अमेरिकन विमानन प्राधिकरणानेही अमेरिकन विमान कंपन्यांना सौदी अरेबियाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताना अत्यंत सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.