

पाकिस्तानचे दिग्गज लेग स्पिनर दिवंगत अब्दुल कादिर यांचा मुलगा आणि माजी क्रिकेटपटू सुलेमान कादिर याला पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेने सुलेमानवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुलेमानला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुलेमान कादिर याने तिला जबरदस्तीने एका फार्म हाऊसवर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यानंतर पीडितेने हिंमत एकवटून पोलिसांत धाव घेतली आणि एफआयआर (FIR) नोंदवला.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी सुलेमानला कोठडीत घेतले आहे.
सुलेमानचे वडील अब्दुल कादिर हे पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक होते. १९७७ मध्ये पदार्पण करणाऱ्या अब्दुल कादिर यांनी १९९३ पर्यंत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते.
त्यांनी ६७ कसोटी सामन्यांत २३६ विकेट्स आणि १०४ एकदिवसीय सामन्यांत १३२ बळी मिळवले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या या महान वारशाला सुलेमानच्या कृत्यामुळे गालबोट लागल्याची भावना क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
सुलेमान कादिर स्वतः देखील क्रिकेटपटू राहिला आहे. त्याने पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील (U-19) संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ४१ वर्षीय सुलेमानने २००५ ते २०१३ या काळात देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे.
२६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने ८५६ धावा केल्या आहेत, तर ४० 'लिस्ट ए' सामन्यांमध्ये ६१५ धावा करण्यासोबतच २६ बळीही घेतले आहेत. २०१३ मध्ये त्याने आपला शेवटचा व्यावसायिक क्रिकेट सामना खेळला होता. मात्र, आता क्रिकेटमधील कामगिरीपेक्षा या गुन्ह्यामुळेच त्याची जगभर चर्चा होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.