
Shehbaz Sharif UNSC Speech: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी (26 सप्टेंबर) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) शिखर परिषदेतील आपल्या भाषणात पुन्हा एकदा दुटप्पी भूमिका घेतलेली दिसली. एका बाजूला त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उघडपणे चापलुसी करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, तर दुसऱ्या बाजूला याच जागतिक व्यासपीठाचा वापर त्यांनी नेहमीप्रमाणे भारताच्या विरोधात विषारी प्रचार करण्यासाठी केला.
शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणाचा मोठा भाग भारतावर लष्करी हल्ल्याचे खोटे आरोप करण्यात खर्ची घातला. त्यांनी पुन्हा एकदा भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा जुना आणि वेळोवेळी बदललेला दावा केला.
शरीफ म्हणाले, "आमच्या फाल्कन जेट्सनी उड्डाण केले आणि 7 भारतीय जेट विमानांना कबाडात बदलून टाकले." पाकिस्तानकडून भारतीय विमानांच्या पाडलेल्या संख्येबाबत वारंवार वेगवेगळे दावे केले जातात. यापूर्वी पाकिस्तानने 2, 3 किंवा 5 विमाने पाडल्याचे दावे केले होते, पण आता शरीफ यांनी ही संख्या 7 वर नेऊन ठेवली आहे. यावरुन पाकिस्तानचे दावे खोटे आणि निराधार असल्याचे पुन्हा सिद्ध होते.
पुढे बोलताना शरीफ यांनी भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत पाकिस्तानचे वर्तन न्यायसंगत ठरवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, "गेल्या वर्षी आम्ही इशारा दिला होता की, पाकिस्तान कोणत्याही बाहेरील आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर देईल. याच वर्षी मे महिन्यात पूर्व फ्रंटवरुन हल्ला झाला, शत्रू अहंकाराने चाल करुन आला, पण आम्ही त्यांना जशास तसे उत्तर दिले." आपली राष्ट्रीय सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता धोक्यात आल्यावर पाकिस्तानने आत्मसंरक्षणाच्या अधिकाराखाली उत्तर दिले, असेही त्यांनी सांगितले.
शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमनांची उधळण केली. त्यांनी जाहीरपणे ट्रम्प यांची खुशामत करताना भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे प्रयत्नच कारणीभूत होते, असा दावा केला.
शरीफ म्हणाले, "पाकिस्तान युद्धविरामसाठी राजी झाला, कारण तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नांचा परिणाम होता. जर ट्रम्प यांनी वेळेवर हस्तक्षेप केला नसता, तर संपूर्ण दक्षिण आशियामध्ये मोठे युद्ध झाले असते, ज्याचे परिणाम भयंकर झाले असते. युद्धविरामसाठी मी ट्रम्प यांचे धन्यवाद मानतो."
या वक्तव्यावरुन पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट होते. जागतिक मंचावर एखाद्या जागतिक नेत्याला सार्वजनिकपणे श्रेय देऊन पाकिस्तान आपल्या द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
एकीकडे खोटे आणि भ्रामक लष्करी दावे करत असतानाच शरीफ यांनी भारतावर राजकीय फायदा घेण्याचा आरोप केला. त्यांनी भारताने पाकिस्तानी शहरे आणि नागरिकांवर हल्ला केल्याचेही म्हटले. मात्र, या सर्व वादग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी 'चर्चा आणि कूटनीती'च्या माध्यमातून शांततापूर्ण समाधानाची वकिली केली. ही विसंगती पाकिस्तानचा दुटप्पीपणा दर्शवते.
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर खोटा प्रचार करण्यासाठी केल्याने भारताने यावर कठोर भूमिका घेतली. पाकिस्तानच्या या प्रचारकी भाषणाचा आणि खोट्या दाव्यांचा पर्दाफाश करण्यासाठी भारताने जोरदार तयारी केली आहे.
'प्रत्युत्तराचा अधिकार' (Right of Reply) या राजनयिक नियमांतर्गत भारत आता शनिवारी (27 सप्टेंबर) संयुक्त राष्ट्रांच्या याच मंचावर शरीफ यांच्या भाषणातील प्रत्येक विधानाचा तंतोतंत आणि तथ्यात्मक उत्तर देणार आहे. पाकिस्तानचे खोटे दावे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर उघड पाडले जावेत आणि भारताची वास्तविक भूमिका स्पष्ट व्हावी, हा या प्रत्युत्तरामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे, आता आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष भारताच्या उत्तराकडे लागून राहिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.