
Shehbaz Sharif Video: संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 80व्या सत्रात आपल्या भाषणापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना शुक्रवारी (26 सप्टेंबर) संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रवेश करताना एशियन न्यूज इंटरनॅशनल (ANI) च्या पत्रकाराच्या प्रश्नाचा सामना करावा लागला. सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावरुन दोन्ही बाजूंकडून शाब्दिक चकमक झाली, ज्यामुळे भारत-पाक संबंधांमधील तणाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर समोर आला.
यूएन मुख्यालयात प्रवेश करत असताना एएनआयच्या पत्रकाराने शाहबाज शरीफ यांना थेट विचारले, "पाकिस्तान सीमापार दहशतवाद कधी थांबवणार?" या प्रश्नावर शरीफ यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. ते मध्येच थांबले आणि कॅमेऱ्याकडे वळून म्हणाले, "आम्ही दहशतवाद संपवत आहोत."
शरीफ यांनी उत्तर दिल्यावर एएनआयच्या पत्रकाराने लगेच टोला मारत म्हटले, "पाकिस्तानी पंतप्रधान, भारत तुम्हाला हरवत आहे." या थेट आणि तिखट टिप्पणीवर मात्र शरीफ यांनी कोणतेही उत्तर दिले नाही आणि ते त्वरित सभागृहात निघून गेले.
दरम्यान, या घटनेची पार्श्वभूमी अलीकडील भारत-पाक लष्करी संघर्षाशी जोडलेली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मे 2025 रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केले होते.
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करुन हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. भारताने ही कारवाई दहशतवादी पायाभूत सुविधांवर केंद्रित असल्याचे आणि नागरी किंवा लष्करी तळांना हानी पोहोचवली नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर, पाकिस्तानच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईला भारताने निष्क्रिय केले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या डीजीएमओने (DGMO) भारतीय डीजीएमओशी संपर्क साधून युद्धविराम करण्याची तयारी दर्शवली, जी भारताने मान्य केली.
या दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि त्यांचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ओव्हल ऑफिसमध्ये एक खासगी बैठक झाली. ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना या भेटीवर विनोदी टिप्पणीही केली होती.
मे 2025 मध्ये झालेल्या भारत-पाक लष्करी तणावादरम्यान इस्लामाबादने ट्रम्प यांना शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय दिले होते. ट्रम्प यांनी व्यापार आणि शुल्काच्या धमक्यांच्या माध्यमातून युद्धविराम घडवून आणल्याचा दावा केला. पाकिस्तानने आपल्या DGMO च्या पुढाकाराला सुरुवातीला श्रेय दिले असले तरी, नंतर त्यांनी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले.
तथापि, भारताने ट्रम्प यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. त्यानंतर शरीफ यांनी ट्रम्प यांना पाकिस्तानच्या कृषी, तंत्रज्ञान, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे निमंत्रणही दिले, ज्यामुळे अमेरिका-पाकिस्तानची जवळीकता पुन्हा एकदा दिसून आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.