

Pakistan LPG Gas Cylinder Price 7000 PKR: पाकिस्तान सध्या अत्यंत गंभीर आर्थिक आणि ऊर्जा संकटाच्या गर्तेत अडकला आहे. देशात एलपीजीचा भीषण तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, काही दिवसांपूर्वी साडेचार हजार पाकिस्तानी रुपयांना मिळणारा 12 किलोचा गॅस सिलेंडर आता तब्बल 7000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या काही दिवसांत एलपीजीच्या दरात 56 टक्क्यांची वाढ झाली.
या मोठ्या संकटाचे मुख्य कारण म्हणजे इराणच्या सीमेवरुन होणारा पुरवठा ठप्प होणे हे आहे. 17 ऑक्टोबरपासून इराणच्या दोन सीमा बंद करण्यात आल्यामुळे पाकिस्तानात दररोज येणारा सुमारे 7000 मेट्रिक टन एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. बलुचिस्तान सरकारने सुरक्षा आणि तस्करी रोखण्याचे कारण देत ही सीमा बंद केली.
दरम्यान, या एलपीजी संकटाचा सर्वाधिक फटका ऑटो-रिक्षा चालकांना बसला. एकट्या लाहोर शहरात सुमारे 70 टक्के ऑटो-रिक्षा एलपीजीवर चालतात. इंधनाचे भाव गगनाला भिडल्यामुळे आणि पुरवठा कमी झाल्यामुळे या चालकांची दैनंदिन कमाई अर्ध्यावर आली. अनेक चालकांना आता दिवसातून दोन किंवा तीन वेळा महागडे इंधन भरावे लागत आहे, ज्यामुळे घरखर्च चालवणे आणि रिक्षाचे भाडे देणे अशक्य झाले आहे. कमाई घटल्यामुळे आणि महागाई प्रचंड वाढल्यामुळे गरीब कुटुंबांना नाईलाजाने अन्नाची कपात करावी लागत असून, दिवसातून तीन ऐवजी दोनच वेळा जेवून दिवस काढावा लागत आहे.
दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. देशात महागाईचा दर 9.6 टक्क्यांवर पोहोचला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथील मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवून 12 टक्के केले. इराण सीमेवरुन गॅस पुरवठा पूर्ववत सुरु होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकऱ्यांची ही होरपळ अशीच सुरु राहण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.