Saifullah Khalid Killed: लष्करच्या गाझीचा अंत...! दहशतवादी सैफुल्ला खालिदचा खेळ खल्लास, भारतातील तीन हल्ल्यांचा होता मास्टरमाइंड
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका घटनेमुळे लष्कर-ए-तोयबा आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये घबराट निर्माण झाली आहे. लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर रजाउल्लाह निजामानी उर्फ सैफुल्लाह खालिद याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. सिंध प्रांतातील माटली शहरातील फलकारा चौकात त्याची हत्या करण्यात आली, जिथे तो घराबाहेर पडताच हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. अबू सैफुल्ला खालिद हा मलान भागातील रहिवासी होता, तो बराच काळ काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.
त्याला अलर्ट करण्यात आले होते
काश्मीरमधून परतल्यानंतर लष्कर-ए-तोयबाने (Lashkar-e-Taiba) त्याला गाझी अबू सैफुल्लाह ही पदवी दिली होती. अलीकडेच त्याला अलर्ट करण्यात आले होते. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले होते. त्याला सुरक्षा देखील देण्यात आली होती, परंतु ज्या दिवशी तो माटली शहरातील त्याच्या घराबाहेर पडला, त्याच दिवशी हल्लेखोरांनी डाव साधून त्याचा गेम केला. अबू सैफुल्लाह हा भारतातील अनेक मोठ्या लष्कर हल्ल्यांचा सूत्रधार होता. भारतात कमीत कमी तीन दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते.
या तिन्ही हल्ल्यांमागील सैफुल्ला सूत्रधार
रामपूर सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला... 2001 मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सीआरपीएफ ग्रुप सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची योजना रजाउल्लाह निजामानी यानेच आखली होती. या हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते. नंतर, तपास संस्थांनी या हल्ल्याच्या नियोजनाशी संबंधित नावे उघड केली, ज्यामध्ये अबू सैफुल्लाह सर्वात टॉपवर होता.
बंगळुरुमध्ये दहशत होती... अबू सैफुल्लाहने 2005 मध्ये बंगळुरुध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा कटही रचला होता. या बॉम्बस्फोटांनी बंगळुरु शहर हादरले होते. हा हल्ला आयटी कंपन्या आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य करुन करण्यात आला होता.
नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले... 2006 मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला लक्ष्य करुन मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा डाव उधळून लावला होता. तपासात हे स्पष्ट झाले होते की, अबू सैफुल्लाह हा या हल्ल्यामागील सूत्रधार होता.
लष्करासाठी भरती आणि फंडिंगची जबाबदारी
स्थानिक सूत्रांनी आणि सुरक्षा एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, अबू सैफुल्लाहची हत्या ही नियोजित लक्ष्य हत्याकांडाचा भाग असू शकते. अबू सैफुल्लाहने जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतविरोधी दहशतवादी कारवाया केल्या होत्या आणि पाकिस्तानात (Pakistan) परतल्यानंतर तो सिंधमध्ये जमात आणि लष्करसाठी भरती आणि फंडिंग देण्यासारख्या कारवायांमध्ये सक्रिय होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.