

Tiktok Video Shoot Tigress Attack In Lahore: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या जीवघेण्या नादात लाहोर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. लाहोरमधील काहना परिसरात असलेल्या एका खाजगी फार्महाऊसमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी पिंजऱ्यातून बाहेर काढलेल्या वाघिणीने 19 वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला केला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेंट क्रिएटर नौमान हसन हा टिकटॉक व्हिडिओ चित्रित करण्यासाठी या फार्महाऊसवर पोहोचला होता आणि व्हिडिओ अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्याने वाघिणीला पिंजऱ्यातून बाहेर काढायला लावले. याच दरम्यान बिथरलेल्या वाघिणीने फार्महाऊसमध्ये काम करणाऱ्या तल्हा नावाच्या 19 वर्षीय तरुणावर झडप घातली. या भीषण हल्ल्यात तल्हा गंभीर जखमी झाला, ज्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, सुरुवातीला या गंभीर घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तल्हाचा मृत्यू कुत्र्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु सखोल तपासात हा मृत्यू वाघिणीच्या हल्ल्यामुळेच झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर लाहोर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फार्महाऊसचा मालक फय्याज आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नौमान हसन या दोघांना बेड्या ठोकल्या. टिकटॉकचा छंद हा कोणाच्याही मौल्यवान जिवापेक्षा मोठा असू शकत नाही आणि मनोरंजनासाठी इतरांचे प्राण धोक्यात घालण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही, असा कडक इशारा पोलिसांनी दिला.
सध्या पोलीस (Police) प्रशासन या दिशेने तपास करत आहे की, फार्महाऊसच्या मालकाकडे वाघीण पाळण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवानगी होती की नाही आणि तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती का? या दुर्घटनेनंतर संबंधित वाघिणीला सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, सत्य लपवण्याचा प्रयत्न आणि निष्काळजीपणा केल्याबद्दल आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.