

Pakistan Hindu Girl Kidnapped: पाकिस्तानातून हिंदू महिला, मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. सध्या पाकिस्तानातील अशाच एक घटनेने खबळबळ उडवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी, एका तरुणीचे अपहरण करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर एका वयस्कर मुस्लिम व्यक्तीशी तिचे लग्न लावून देण्यात आले. या प्रकरणाची माहिती हिंदू समुदायाच्या एका नेत्याने दिल्यानंतर एकच हल्लकल्लोळ उडाला. या प्रकरणाची न्यायालयालाही दखल घ्यावी लागली. आता सिंध प्रांतातील एका न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या हिंदू तरुणीला तिच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आले.
कराचीपासून सुमारे 310 किलोमीटर पूर्वेस असलेल्या उमरकोट (Umarkot) येथील एका न्यायालयाने सुनीता कुमारी महाराज (Sunita Kumari Maharaj) नावाच्या या तरुणीला कुटुंबाकडे सोपवण्याचा आदेश दिला. पीडितेच्या आई-वडिलांच्या वतीने या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे हिंदू कार्यकर्ते शिव काछी यांनी याबाबत माहिती दिली.
मीरपुरखास जिल्ह्यातील (Mirpurkhas District) कुनरी शहरातून सुनिताचे अपहरण करण्यात आले आणि नंतर तिचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. धर्मांतरानंतर एका वयस्कर मुस्लिम व्यक्तीशी तिचे लग्न लावण्यात आले. मात्र आता स्थानिक हिंदू समुदायाचे नेते आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी (Human Rights Activists) न्यायालयाच्या या निर्णयावर समाधान व्यक्त केले. त्यांच्या मते, सुनीता ही मोजक्याच अशा भाग्यवान हिंदू मुलींपैकी आहे, जिला न्याय मिळाला.
उमरकोट येथील अधिवक्ता चंदर कोहली यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “सुनीताचे प्रकरण हे एकमेव नाही. हिंदू मुलींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर आणि लग्न हे असे संकट आहे, ज्यामुळे सिंध प्रांतातील आमच्या समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.”
सुनीताच्या आई-वडिलांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची तक्रार दाखल केल्यानंतर, ती उमरकोटमध्ये असल्याची माहिती मिळाली. न्यायालयाने अनेक सुनावण्या घेतल्यानंतर तिला सुरुवातीला सुरक्षित स्थळी ठेवण्याचे निर्देश दिले.
या अल्पवयीन तरुणीला 10 ऑक्टोबर रोजी मीरपुरखास जिल्ह्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा तिने न्यायाधीशांना सांगितले की, तिचे अपहरण करण्यात आले, जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले आणि तिच्या इच्छेविरुद्ध एका वयस्कर मुस्लिम व्यक्तीशी तिचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना मुलीला सुरक्षित स्थळी ठेवण्याचे निर्देश दिले.
अधिवक्ता चंदर कोहली यांनी या प्रकरणातील सर्वात मोठी समस्या स्पष्ट केली. ते म्हणाले, “सर्वात मोठी समस्या ही आहे की, बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी त्यांच्या विवाहाचे समर्थन करण्यासाठी आणि मुलीची (पीडितेची) संमती असल्याचे सिद्ध करण्यासाठी बनावट कागदपत्रे (Fake Documents) सादर करतात.”
या पीडित मुली बहुतेक गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडे त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पुरेसे संसाधने किंवा ज्ञान नसते. कोहली यांनी जोर दिला की, "याच कारणामुळे अनेक हिंदू नेते आता अधिक शिकलेल्या आणि जाणकार हिंदूंना अशा प्रकरणांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, कारण हा आमच्या समुदायासाठी एक मोठा सामाजिक आणि धार्मिक मुद्दा बनला आहे."
अशाच एका अन्य प्रकरणात, गेल्या महिन्यात 15 वर्षीय हिंदू मुलीने सिंधमधील एका न्यायालयात आपल्या कुटुंबाकडे परत जाण्याची विनंती केली होती. तिचेही कथितपणे अपहरण, बलात्कार करुन इस्लाममध्ये धर्मांतर करुन जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.