Pakistan former PM Imran Khan Arrested: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) अध्यक्ष इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्संनी अटक केली आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या बाहेर पाकिस्तानी रेंजर्संनी अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना अटक केली, जिथे ते त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआरमध्ये जामीन मागण्यासाठी गेले होते. अटकेनंतर इम्रान खान यांना अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेची इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दखल घेतली असून मुख्य न्यायमूर्तींनी आयजींना समन्स बजावले आहे.
यासोबतच न्यायमूर्तींनी आयजींना 15 मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयजी न्यायालयात पोहोचले नाहीत तर पंतप्रधानांना हजर रहावे लागेल, असे मुख्य न्यायमूर्ती म्हणाले.
दरम्यान, खान यांच्या अटकेच्या वेळी पाकिस्तानी रेंजर्स आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली, त्यात काही वकील जखमी झाले.
त्याचा व्हिडिओ इम्रान खान यांच्या पक्षाने शेअर केला असून न्यायालयाच्या आवारात वकील गंभीर जखमी झाल्याचा दावा केला आहे.
नुकतेच इम्रान खान यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चे अधिकारी मेजर जनरल फैसल नसीर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
फैसल नसीर आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांना फटकारले होते.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) पाक रेंजर्सवर गंभीर आरोप केले. खान यांचे अपहरण झाल्याचे पक्षाने म्हटले आहे. इम्रान खान यांना कुठे नेण्यात आले आहे, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचा दावा पीटीआयने केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.