पाकिस्तान आणि त्याचा शेजारी देश अफगाणिस्तानात सध्या काहीही अलबेल नाही. यातच आता, पाकिस्तानने अफगाणिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यात 7 तालिबान ठार झाल्याची माहिती आहे.
अफगाणिस्तानात घुसल्यानंतर पाकिस्तानने दोन दहशतवादी तळांवर हा सर्जिकल स्ट्राईक केला. यासाठी दोन प्रांतांना लक्ष्य करण्यात आले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसून तेहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खोस्त आणि पक्तिता प्रांतात दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हवाई हल्ला करण्यात आला आहे.
दरम्यान, खोरासान मीडिया आउटलेटच्या वृत्तानुसार, पक्तिता येथील सर्जिकल स्ट्राईकमध्ये तालिबानी कमांडर अब्दुल्ला शाहच्या लपून बसलेल्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले आहे. शाह मारला गेला की नाही याची पुष्टी झाली नसली तरी पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan Army) या हवाई हल्ल्यात शाह याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
खोरासानच्या म्हणण्यानुसार, हे मारले गेलेले तालिबान (Taliban) दहशतवादी हाफिज गुलबहादर गटाचे आहेत, ज्यांचा पाकिस्तानमधील वझिरीस्तानमधील लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. 16 मार्चच्या पहाटे, या तालिबानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या बेस कॅम्पवर हल्ला केला आणि स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने पोस्टला धडक दिली. या भीषण स्फोटात 5 जवानांचा जागीच मृत्यू झाला होता.
पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया शाखा ISPR ने सांगितले होते की, 16 मार्चच्या पहाटे दहशतवाद्यांच्या एका गटाने वझिरीस्तानमधील एका चौकीवर हल्ला केला होता. लष्कराने हल्ल्याचा पहिला प्रयत्न हाणून पाडला, त्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन पोस्टमध्ये घुसवले, या स्फोटात 5 जवान शहीद झाले. यानंतर लष्कराने प्रत्युत्तर देत 6 दहशतवाद्यांना ठार केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.