

Pakistan Afghanistan Tension: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील शांततेच्या आशा पुन्हा एकदा धुळीला मिळाल्या. काबूल येथे दोन्ही देशांमध्ये झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर गुरुवारी (6 नोव्हेंबर) हल्ला केला. या हल्ल्यानंतर सीमावर्ती भागात मोठी पळापळ झाली असून अनेक ठिकाणी धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
शांतता चर्चा अयशस्वी ठरल्याचे पाहून पाकिस्तानी सैन्याने केलेला युद्धविराम मोडला. पाकिस्तानी सैन्याने कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्डाक (Spin Boldak) जिल्ह्यातील लुकमान (Lukman) गावात अफगाण तालिबानच्या सीमा सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर या भागात मोर्टार हल्ले देखील करण्यात आले.
टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या (Pakistan) बाजूने या परिसरातील नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये मोठी दहशत पसरली. नागरिक सुरक्षित जागा शोधण्यासाठी पळताना दिसले. या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहेत. गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हल्ले सुरु झाले, संध्याकाळपर्यंत या हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढली.
अफगाण तालिबानचे (Taliban) प्रवक्ते जबरुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. मुजाहिद यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही उत्तेजनाशिवाय सीमेवर तैनात असलेल्या अफगाण रक्षकांवर गोळीबार केला. मुजाहिद म्हणाले, "आमच्या सैन्याने गोळीबाराला प्रत्युत्तर दिले, परंतु नागरिकांच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे."
सुरुवातीच्या गोळीबारानंतर पाकिस्तानने मोर्टार डागले, जे लुकमान गावातील एका घरावर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु घराचे मोठे नुकसान झाले.
गेल्या दोन महिन्यांत पाकिस्तानने अफगाण सीमेवर केलेली ही तिसरी आक्रमक कारवाई आहे. विश्लेषकांच्या मते, पाकिस्तान तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) सारख्या दहशतवादी गटांना अफगाणिस्तानात आश्रय मिळत असल्याच्या आरोपांचा बदला म्हणून पाकिस्तान अशी आक्रमकता दाखवत आहे. त्याचवेळी, अफगाण सरकारने संयुक्त राष्ट्रांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली, तर पाकिस्तानने याला सीमा सुरक्षा अभियान म्हटले. तसेच, अमेरिकेने दोन्ही देशांना संयम राखण्याचे (Maintain Restraint) आवाहन केले.
कंदाहारच्या राज्यपालांनी सीमावर्ती भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देत तातडीची परिस्थिती (Emergency) घोषित केली. हा छोटासा संघर्ष मोठ्या युद्धाचे रुप घेतो की काय, या चिंतेने जागतिक समुदाय सध्या चिंतीत आहे. अफगाण सैन्य हाय अलर्टवर असून सीमेवर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.