
पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारतावर गरळ ओकली आहे. शनिवारी अबोटाबाद येथील लष्करी अकादमीतील एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी भारताला थेट अण्वस्त्रयुद्धाची धमकी दिली.
मुनीर म्हणाले, “भारताचा हा गैरसमज लवकरच दूर होईल की ते आपल्या आकारमानामुळे सुरक्षित आहे. अण्वस्त्रधारी वातावरणात युद्धाला स्थान नाही, पण जर संघर्ष झाला, तर पाकिस्तानी प्रत्युत्तर हल्लेखोरांच्या कल्पनेच्या पलीकडे असेल.”
त्यांनी पुढे म्हटले की, “कोणत्याही देशाने पाकिस्तानच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नये. आमच्याकडे आमच्या देशाचे आणि जनतेचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक साधनं आणि इच्छाशक्ती आहे.”
मुनीर यांच्या या वक्तव्यामुळे भारत-पाकिस्तान तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताकडून मात्र या धमकीवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानच्या लष्कराकडून भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात असून, काश्मीर आणि सीमावर्ती भागातील चकमकी वाढल्याचं दिसून येत आहे.
ते पुढे म्हणाले, “ऑपरेशन बुनयान-उम-मरसूज दरम्यान पाकिस्तानी सैन्याने स्वतःपेक्षा कितीतरी मोठ्या शत्रूला पराभूत केले आहे. अल्लाहच्या मदतीने आणि जनतेच्या पाठिंब्याने पाकिस्तानने आपली सीमा आणि सार्वभौमत्व यांचे यशस्वीपणे रक्षण केले आहे.”
मुनीर यांनी हेही सांगितले की, “पाकिस्तानची एक इंचही जमीन कोणत्याही शत्रूला दिली जाणार नाही. भारताच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी गटांना आम्ही चिरडून टाकू.”
लष्करप्रमुखांनी आपल्या भाषणात दावा केला की, पाकिस्तानी हवाई दलाने भारताचे राफेल विमाने पाडली असून, भारतीय लष्कराच्या अनेक तळांवर आणि एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालींवर यशस्वीपणे लक्ष्य केले आहे. तथापि, या दाव्याला कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
मुनीर यांनी काश्मीरमधील दहशतवाद आणि मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप करत काश्मिरींना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली. “पाकिस्तान काश्मिरी भावंडांच्या स्वातंत्र्यलढ्याला पूर्ण पाठिंबा देत राहील,” असे ते म्हणाले.
याशिवाय, त्यांनी सौदी अरेबियासोबत झालेल्या संरक्षण कराराचा उल्लेख करत तो पाकिस्तान-सौदी बंधुत्व दृढ करणारा असल्याचे सांगितले. “हा करार मध्य पूर्व आणि आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे,” असे मुनीर यांनी नमूद केले.
मुनीर यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने इराणसोबत शांततापूर्ण संवाद सुरू केला आहे आणि इतर मुस्लिम देशांसोबतही संबंध वाढवत आहे. त्यांनी चीनसोबतच्या ऐतिहासिक भागीदारीबद्दल अभिमान व्यक्त केला आणि अमेरिकेसोबतचे मजबूत संबंध पाकिस्तानसाठी प्रेरणादायी असल्याचेही सांगितले.
शेवटी ते म्हणाले, “पाकिस्तान कधीच कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला किंवा भाषणात्मक धमक्यांना घाबरणार नाही. आमचे सामर्थ्य आमच्या जनतेच्या एकतेत आणि आमच्या लष्कराच्या शौर्यात आहे.”
मुनीर यांनी दावा केला की, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांसाठी आपली भूमी वापरू देऊ नये, अन्यथा पाकिस्तान आवश्यक ती पावले उचलेल. त्यांच्या या वक्तव्याच्या केवळ काही तासांपूर्वी, पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.