
Openai CEO Sam Altman: जगप्रसिद्ध चॅटजीपीटी (ChatGPT) बनवणारी कंपनी ओपनएआय (OpenAI) ने आपले सर्वात प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल, जीपीटी-5 (GPT-5) नुकतेच लॉन्च केले. या लॉन्चच्या वेळी कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन (Sam Altman) यांनी भारत हा एआयची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे म्हटले. सध्या अमेरिका नंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेली भारतीय बाजारपेठ लवकरच अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सॅम ऑल्टमॅन यांच्या मते, भारत (India) हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. येथे वैयक्तिक वापरकर्त्यांपासून ते मोठे व्यावसायिकही झपाट्याने एआयचा अवलंब करत आहेत. एआयचा वापर केवळ क्रिएटिव्ह क्षेत्रापुरता मर्यादित नसून दैनंदिन जीवनातील कामांसाठीही मोठ्या प्रमाणावर होत आहे.
ऑल्टमॅन यांनी सांगितले की, ते लवकरच भारतीय वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन खास उत्पादने डिझाइन करणार आहेत. यासाठी ते स्थानिक भागीदारांसोबत काम करत आहेत. पीटीआयच्या एका अहवालानुसार, हे नवीन एआय उत्पादन सर्वांसाठी परवडणारे (affordable) असेल, जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची पोहोच होईल.
सॅम ऑल्टमॅन पुढील महिन्यात, म्हणजेच सप्टेंबरमध्ये भारताला भेट देणार आहेत. या भेटीचा उद्देश येथील लोकांची गरज समजून घेणे हा आहे. ते म्हणाले, “अमेरिकेनंतर भारत ही आमची दुसरी सर्वात मोठी एआय बाजारपेठ आहे आणि ती खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे लवकरच ती अमेरिकेला मागे टाकेल.”
एकीकडे सॅम ऑल्टमॅन भारताला मोठी बाजारपेठ मानत असताना, दुसरीकडे अमेरिका (America) आणि भारत यांच्यात 'टॅरिफ वॉर' सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही भारतीय वस्तूंवर 50 टक्के ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लावला. यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकेच्या बाजारपेठेत अधिक महाग होऊ शकतात, ज्यामुळे त्यांची मागणी घटण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या या धोरणामुळे 'मेक इन इंडिया' अंतर्गत भारतात आयफोन तयार करण्याच्या ॲपल (Apple) कंपनीच्या योजनेलाही धोका निर्माण झाला आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन सुरु केले होते. मात्र, आता ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतात बनवलेले आयफोन अमेरिकेत विकायचे झाल्यास ते खूप महाग होतील. सध्या तरी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना या टॅरिफमधून सूट देण्यात आली आहे, पण अमेरिकेबाहेर बनवलेल्या कम्प्युटर चिप्स आणि सेमीकंडक्टरवर 100 टक्के टॅरिफ लावला आहे. या सर्व घडामोडींवरुन हे स्पष्ट होते की, भारतीय बाजारपेठ ही तंत्रज्ञान कंपन्यांसाठी मोठी संधी आहे, पण राजकीय आणि व्यापारविषयक धोरणांमुळे काही क्षेत्रांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.