Worlds Richest Person: गेल्या काही काळात सतत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या पदावर विराजमान राहिलेले टेस्ला, स्पेसएक्स, ट्विटर या कंपन्यांचे मालक एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत. त्यांचा हा मान दुसऱ्या एका उद्योगपतीने हिरावून घेतला आहे. विशेष म्हणजे हा दुसरा उद्योगपतीदेखील यापुर्वी काही काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत.
फोर्ब्ज या नियतकालिकाने जगातील टॉप-10 अब्जाधीशांची नवी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एलन मस्क दुसऱ्या स्थानी आहेत. तर पहिल्या स्थानी उद्योगपती बर्नार्ड अलनॉल्ट (Bernard Arnault) आहेत. अर्नॉल्ट हे आजघडीला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी आहेत.
फोर्ब्सच्या मते, बर्नार्ड अर्नॉल्ट, जगातील आघाडीच्या लक्झरी उत्पादन समू असलेल्या लुई व्हिटॉन मोएट हेनेसी या ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती 188.5 अब्ज डॉलर इतकी आहे. 51 वर्षीय एलन मस्क यांची संपत्ती जानेवारीपासून 100 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 177.7 अब्ज डॉलरवर आली आहे. फोर्ब्सच्या मते, बर्नार्ड अर्नॉल्ट लुई व्हिटॉन आणि सेफोरासह सुमारे 70 फॅशन आणि ब्युटी ब्रँडचे साम्राज्य चालवत आहेत.
फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, दोन भारतीयांनी जगातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले आहे. गौतम अदानी 134 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर मुकेश अंबानी, ज्यांची सध्याची संपत्ती 92.5 अब्ज डॉलर आहे, ते या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 116.17 अब्ज डॉलर आहे. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे 108.5 अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. बिल गेट्स 107.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन 105.7 अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकावर आहेत. तर कार्लोस स्लिम हेलू 81.8 अब्ज डॉलर संपत्तीसह नवव्या स्थानावर आहे. या यादीत स्टीव्ह बाल्मर दहाव्या क्रमांकावर आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.