Nigeria Road Accident
Truck AccidentDainik Gomantak

Truck Accident: नियंत्रण सुटलं अन् काळानं झडप घातली! हायवेवर ट्रक उलटून 30 प्रवाशांचा मृत्यू; काही क्षणातचं होत्याचं नव्हतं झालं

Nigeria Road Accident: नायजेरियाच्या कानो राज्यात एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक रस्ते अपघात घडला.
Published on

Nigeria Truck Accident : नायजेरियाच्या कानो राज्यात एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक अपघात घडला असून, यामध्ये 30 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. उत्तर नायजेरियातील कानो राज्याच्या गेजावा स्थानिक सरकारी क्षेत्रातील क्वानार बार्डे शहरात ही दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेला एक ट्रक हायवेवर प्रचंड वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक भीषण अपघाताचा बळी ठरला. या अपघाताचे मुख्य कारण चालकाचा बेजबाबदारपणा आणि अतिवेग असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत केवळ 30 लोकांचा मृत्यूच झाला नाही, तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक कानोच्या गुजुंगु शहराच्या दिशेने प्रवासी आणि सामान घेऊन जात होता. हायवेवर असताना ट्रकचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेग जास्त असल्यामुळे वळणावर चालकाला ट्रक सावरता आला नाही आणि तो अनियंत्रित होऊन रस्त्यावरच उलटला. कानोच्या गव्हर्नर कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात या घटनेला 'बेजबाबदार ड्रायव्हिंगचा परिणाम' असे म्हटले आहे. स्थानिक मीडियाने देखील या भीषण वास्तवाकडे लक्ष वेधले. सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Nigeria Road Accident
Karnataka Road Accident: कर्नाटकात भीषण अपघात, ट्रक-बसच्या धडकेत 17 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

कानो राज्याचे गव्हर्नर अब्बा कबीर युसूफ यांचे प्रवक्ते सुनुसी बटुरे डावाकिन टोफा यांनी या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, मृतांचा आकडा 30 च्या पुढे गेला असून जखमींची संख्याही मोठी आहे. अनेक जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना तातडीने कानोमधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून गव्हर्नर यांनी त्यांच्या मोफत उपचारांचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

Nigeria Road Accident
Goa Road Accident: अतिवेगामुळे राज्‍यात दरमहा सरासरी 19 जणांचा मृत्‍यू! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची राज्‍यसभेत माहिती

गव्हर्नर अब्बा कबीर युसूफ यांनी या अपघाताला 'मोठी मानवी शोकांतिका' असे संबोधले. त्यांनी शोकग्रस्त कुटुंबांच्या प्रति आपल्या संवेदना व्यक्त करतानाच राज्यातील जनतेला वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. विशेषतः अवजड वाहने चालवणाऱ्या चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात घालू नये, अशी तंबीही त्यांनी दिली. जे चालक रहदारीचे नियम मोडतील किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवतील, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Nigeria Road Accident
Canacona Road Accident: काणकोण- माशे येथे दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू

नायजेरिया (Nigeria) हा आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे, परंतु दुर्दैवाने येथील रस्ते सुरक्षा व्यवस्था अत्यंत कमकुवत आहे. खराब रस्ते, वाहनांची दयनीय अवस्था, ओव्हरलोडिंग आणि अतिवेग यांमुळे नायजेरियात दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. अनेकदा मालवाहू ट्रक्स आणि ट्रेलर्सचा वापर बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे अपघाताची तीव्रता अधिक वाढते. काही दिवसांपूर्वीच अशाच एका अपघातात ब्रिटिश हेवीवेट बॉक्सर अँथनी जोशुआ जखमी झाले होते आणि त्यांचे दोन सहकारी मृत्युमुखी पडले होते. ही मालिका थांबवण्यासाठी आता नायजेरिया सरकारला कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com