खेळ झाला अन् 'काळ' आला! फुटबॉल सामना संपताच अंदाधुंद गोळीबार; 11 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश
Mexico Shooting: मेक्सिकोतील गुआनाजुआतो राज्यातील सलामांका शहरात रक्ताचा सडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. एका फुटबॉल सामन्याच्या सांगतेनंतर काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मैदानावर अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण गोळीकांडात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण मेक्सिकोमध्ये संतापाची लाट उसळली असून स्थानिक प्रशासनाने याला 'भ्याड हल्ला' म्हटले.
मैदानावर रक्ताचा सडा
मिळालेल्या माहितीनुसार, सलामांका शहरात एका स्थानिक फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. सामना संपल्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच अचानक काही बंदूकधाऱ्यांनी तिथे प्रवेश केला आणि काहीही विचार न करता गोळीबार सुरु केला. गोळीबाराच्या आवाजाने मैदानावर एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी लोकांच्या दिशेने शेकडो राउंड फायर केले. यामध्ये 10 लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमी व्यक्तीने रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान जीव सोडला.
मेयरची राष्ट्रपतींकडे आर्त हाक
सलामांकाचे मेयर सीजर प्रीटो यांनी सोशल मीडियावर (Social Media) एक अधिकृत निवेदन जारी करुन या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, जखमींमध्ये एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. "या क्रूर घटनेमुळे शहरात दुःखाचे आणि दहशतीचे वातावरण आहे. काही गुन्हेगारी टोळ्या प्रशासनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही," असे प्रीटो यांनी ठामपणे सांगितले. या वाढत्या हिंसाचाराला रोखण्यासाठी मेयर प्रीटो यांनी मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शिनबाम यांच्याकडे तातडीने लष्करी आणि सुरक्षा मदतीची मागणी केली.
टोळीयुद्धाचा शाप
मेक्सिकोमधील गुआनाजुआतो हे राज्य गेल्या काही वर्षांपासून अंमली पदार्थांच्या तस्करी आणि टोळीयुद्धाचे केंद्र बनले आहे. येथे स्थानिक टोळी 'सांता रोजा डी लीमा' आणि बलाढ्य 'जलिस्को न्यू जेनरेशन कार्टेल' यांच्यात वर्चस्वावरुन सतत संघर्ष होत असतो. गेल्या वर्षी मेक्सिकोमध्ये सर्वाधिक हत्या याच राज्यात झाल्या होत्या. फुटबॉल मैदानावर झालेला हा हल्ला देखील याच टोळीयुद्धाचा भाग असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत.
सरकारचा दावा आणि वास्तव
मेक्सिको सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये देशातील हत्येचे प्रमाण 2016 नंतरच्या नीचांकी स्तरावर (प्रति 1 लाख लोकांमागे 17.5 हत्या) आले आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही सरकारी आकडेवारी जमिनीवरील वास्तविक परिस्थिती दर्शवत नाही. सलामांका सारख्या शहरांमध्ये आजही गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा प्रभाव असून सामान्य नागरिक या हिंसाचारात भरडला जात आहे.
सध्या राज्य पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

