Canada Prime Minister Justin Trudeau: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा भारतावर बेताल आरोप केले आहेत.
एका पत्रकाराने ट्रुडो यांना विचारले की, कॅनडाच्या भूमीवर आपल्याच नागरिकाच्या (निज्जर) हत्येच्या तपासात काय प्रगती आहे आणि जर प्रगती झाली नाही तर अमेरिकेने कॅनडाच्या बाजूने भारताबाबत कठोर भूमिका घ्यावी का? याला प्रत्युत्तर म्हणून जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भारतावर जे आरोप केले होते, त्याच जुन्या आरोपांची पुन्हा पुनरावृत्ती केली.
जस्टिन ट्रुडो म्हणाले की, 'कॅनडाच्या (Canada) भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील होते. याप्रकरणी आम्ही भारताशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणात सहकार्य करण्याचे आवाहन केले.'
ते पुढे म्हणाले की, 'आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या सार्वभौमत्वाच्या या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत.'
ट्रुडो म्हणाले की, 'आम्ही आमच्या सर्व मित्र आणि भागीदारांसोबत काम करत राहू, तपास यंत्रणा त्यांचे काम करत राहतील.' ते पुढे म्हणाले की, 'कॅनडा हा कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. जर ताकदीच्या जोरावर योग्य-अयोग्य ठरवले जात असेल, बड्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक बनेल.'
कॅनडाचे खासदार चंदन आर्य यांनी पार्लमेंट हिलवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना आमंत्रित करण्याच्या प्रश्नावर जस्टिन ट्रूडो म्हणाले की, 'आम्ही या गंभीर प्रकरणावर भारतासोबत रचनात्मकपणे काम करु.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आम्ही भारत सरकार आणि जगभरातील आमच्या भागीदारांशी संपर्क साधला आहे. म्हणूनच जेव्हा भारताने (India) व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले तेव्हा आम्ही खूप निराश झालो.'
जस्टिन ट्रूडो म्हणाले की, 'आमच्या दृष्टीकोनातून विचार करा. कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असू शकतात असे मानण्याची आमच्याकडे गंभीर कारणे आहेत. आणि यावर भारताची प्रतिक्रिया म्हणजे व्हिएन्ना कन्व्हेन्शनचे उल्लंघन करुन कॅनेडियन राजनयिक टीमची हकालपट्टी करण्यात आली.
जगभरातील देशांसाठी ही चिंतेची बाब आहे. जेव्हा एखाद्या देशाला असे वाटते की, आपले राजनयिक दुसऱ्या देशात सुरक्षित नाहीत, तेव्हा ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक धोकादायक आणि गंभीर बनवते.'
ट्रुडो म्हणाले की, 'आम्ही प्रत्येक पावलावर भारतासोबत रचनात्मक आणि सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढे करत राहू. याचा अर्थ आम्ही भारत सरकारच्या राजनयिकांसोबत काम करत राहू.'
ट्रूडो पुढे असेही म्हणाले की, 'आम्हाला या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा संघर्ष नको आहे. मात्र आम्ही कायद्याच्या पाठीशी नेहमीच उभे राहू. कारण कॅनडाचा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे.'
हरदीप सिंग निज्जर याची यावर्षी 19 जून रोजी सरे येथील गुरुद्वाराच्या पार्किंग परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. निज्जरला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.