Iran Missile Attack In Pakistan
Iran Missile Attack In PakistanDainik Gomantak

600 दहशतवाद्यांचा ग्रुप, कुलभूषण जाधवचे केले होते अपहरण... वाचा- इराणने जैश अल-अदलला का केले लक्ष्य?

Iran Missile Attack In Pakistan: इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला.

Iran Missile Attack In Pakistan: इराणने मंगळवारी पाकिस्तानमधील जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यानंतर ही संघटना जगभरात चर्चेत आली आहे. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यामागे याच संघटनेचा हात होता. जैश अल-अदलने मार्च 2016 मध्ये कुलभूषण जाधव यांचे इराणमधील चाबहार येथून अपहरण केले होते. जाधव यांच्या अपहरणानंतर ही दहशतवादी संघटना भारतीय गुप्तचर संस्थांच्या रडारवर आली होती. जाधव यांचे अपहरण केल्यानंतर जैश अल-अदलने त्यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या ताब्यात दिल्याचे एजन्सींचे म्हणणे आहे. यानंतर पाकिस्तानने जाधव यांच्यावर भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप करुन त्यांना तुरुंगात टाकले. या प्रकरणामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला होता.

दरम्यान, आता इराणने बलुचिस्तानमधील जैश अल-अदलच्या तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर ही संघटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या हल्ल्याबाबत पाकिस्तानने दावा केला आहे की, या हल्ल्यात दोन पाकिस्तानी मुलांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने ही चिथावणीखोर कृती असल्याचे म्हटले असून इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

Iran Missile Attack In Pakistan
Iran-Pakistan Tension: इराणने 'या' घटनेचा बदला घेत पाकिस्तानवर केला क्षेपणास्त्र हल्ला, मारले गेले होते 11 सैनिक

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन 'संपूर्णपणे अस्वीकार्य' आहे आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. दरम्यान, इराणचा हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा मध्यपूर्वेतील संकट अधिक गडद होत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरुच आहे. ज्या दहशतवादी संघटनेला इराणने लक्ष्य केले आहे, त्याचे दहशतवादी इराण-पाकिस्तान सीमेवर दररोज पाकिस्तानी सैनिकांना लक्ष्य करत आहेत. या हल्ल्याची माहिती देताना इराणच्या वृत्तसंस्थेने सांगितले की, या हल्ल्यात जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेला खास लक्ष्य करण्यात आले. इराणने दहशतवाद्यांचे दोन गड यशस्वीपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

जैश अल अदल ही 600 दहशतवाद्यांची संघटना आहे

जैश-अल-अदल म्हणजेच "न्याय दल" हा 2012 मध्ये स्थापन झालेला एक सुन्नी दहशतवादी गट आहे जो मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेली ही दहशतवादी संघटना इराण आणि पाकिस्तानच्या सीमेवर सक्रिय आहे. त्यामुळेच ही संघटना दोन्ही सरकारांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अमेरिका आणि इराण या दोघांनीही या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. या सुन्नी संघटनेत 500 ते 600 दहशतवादी आहेत. गेल्या महिन्यात, इराणचे मंत्री अहमद वाहिदी यांच्या म्हणण्यानुसार, आग्नेय प्रांतातील सिस्तान-बलुचिस्तानमधील एका पोलिस स्टेशनवर रात्रीच्या वेळी झालेल्या हल्ल्यात 11 इराणी पोलिस अधिकारी मारले गेले होते. या घटनेसाठी इराणने जैश-अल-अदलला जबाबदार धरले होते.

Iran Missile Attack In Pakistan
Iran Airstrike: पाकिस्तानात घुसून इराणने उडवून दिले दहशतवाद्यांचे अड्डे; "याचे गंभीर परिणाम होतील," पाकचा इशारा

जैश अल-अदलच्या कारवाया

यूएस डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स (DNI) च्या मते, जैश अल-अदलने 2013 पासून इराणच्या पोलीस आणि सैन्यावर अनेक हल्ले केले होते. या संघटनेचा खून, अपहरण, हिट अँड रन, सरकारी अधिकारी आणि नागरिकांवर छापे टाकणे अशा कारवायांमध्ये हात राहिला आहे. ही संघटना 2013 मध्ये 14 इराणी सुरक्षा कर्मचार्‍यांना ठार मारले तेव्हा पहिल्यांदा चर्चेत आली होती. यानंतर इराण सरकारने काही बलुच कैद्यांना फाशीची शिक्षा जाहीर केली होती. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने अनेक कैद्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com