Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. यातच आता, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या देशाला चारही बाजूंनी कट्टरतावादी शक्तींनी वेढले आहे आणि अशा परिस्थितीत संरक्षण बजेट वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. नेतन्याहू म्हणाले की, ''देशाला आणखी बळकट करणे गरजेचे झाले आहे. आता मित्र राष्ट्रांशी संपर्क वाढवणे गरजेचे झाले आहे.'' दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या हमाससोबतच्या युद्धादरम्यान बेंजामिन नेतन्याहू यांच्या या विधानाला खूप महत्त्व आहे.
दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला आणि 1200 हून अधिक लोक मारले. तेव्हापासून इस्रायल गाझामध्ये युद्ध करत आहे. त्याचवेळी, हिजबुल्लाह लेबनॉनमधूनही इस्रायलवर हल्ले करत आहे. नेतन्याहू म्हणाले की, ''इस्रायलने अनेक वर्षांपासून संरक्षण बजेट वाढवण्याचा प्रयत्न केला होता परंतु जीडीपी पाहता ते कमी करावे लागले. मात्र, हे धोरण पुढे चालू ठेवणार नाही. संरक्षण बजेट किमान 20 टक्के वाढले पाहिजे. जीडीपीच्या आणखी एक टक्का संरक्षण बजेट वाढवण्याची गरज आहे.''
नेतन्याहू पुढे म्हणाले की, 'युद्धाव्यतिरिक्त आमच्यासमोर संरक्षण बजेट वाढवण्याचे मोठे आव्हान आहे.' दरम्यान, गाझामध्ये नागरिकांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबावही वाढत आहे. युरोपीय संघाचे परराष्ट्र व्यवहार प्रमुख जोसेप बोरेलॉन यांनीही गाझामधील नागरिकांना लक्ष्य करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ''आम्ही पाहत आहोत की गाझामध्ये दहशतवादी आणि निरपराध यांच्यात भेद केला जात नाही. यामुळे तीन इस्रायली ओलीस ठार झाले. आता आपण हे सर्व थांबवले पाहिजे. मानवतावादी दृष्टीकोनातून युद्ध थांबवणे फार महत्वाचे झाले आहे.''
शुक्रवारी इस्रायलनेही कबूल केले होते की, आपल्या लष्कराच्या चुकीमुळे गाझामध्ये ओलीस ठेवलेले आपलेच नागरिक मारले गेले. गाझामध्ये आतापर्यंत 19 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचा दावा केला जात आहे. तिथे हमासच्या दहशतवाद्यांचा तळ असल्याचे सांगत इस्रायलने अनेक रुग्णालयांनाही लक्ष्य केले आहे. गाझामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले असल्याचेही बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.