Israeli Citizens Not Allowed In Maldives: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझावर हवाई हल्ले करत आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. युद्धादरम्यान मालदीवच्या मुइज्जू सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मालदीव सरकारने इस्रायली नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. होमलँड सिक्युरिटी आणि टेक्नॉलॉजी मंत्री अली इहुसन म्हणाले की, राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी बंदी लागू करण्यासाठी आवश्यक कायदेशीर बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.
दरम्यान, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांची विशेष कॅबिनेट समिती स्थापन करण्यात आली. "राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू यांनी मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर इस्रायली पासपोर्टवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला," असे मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये इस्रायली पासपोर्ट धारकांना मालदीवमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा करणे आणि या प्रयत्नांवर देखरेख ठेवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणे समाविष्ट आहे," असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दुसरीकडे, गाझावरील इस्रायली सैन्याच्या हल्ल्याबाबत मालदीवच्या लोकांमधील वाढता संताप लक्षात घेऊन मुइज्जू सरकारने हा निर्णय घेतला आहे. मालदीवला (Maldives) दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. यामध्ये इस्रायलमधील सुमारे 15,000 पर्यटकांचा समावेश आहे. त्याचवेळी, मालदीव सरकारने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी निधी उभारण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम देशांशी चर्चा करण्याचा निर्णयही घेतला आहे. UNRWA च्या माध्यमातून पॅलेस्टाईन नागरिकांसाठी निधी गोळा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला राफाह शहरावरील हल्ले थांबवण्यास सांगितले होते, असे असतानाही इस्रायली लष्कराचे रणगाडे राफाहमध्ये घुसले. हमाससोबत युद्ध सुरु झाल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी इस्रायली लष्कराने राफाहमध्ये कारवाई सुरु केली. 27 मे रोजी इस्रायलने राफाह येथील निर्वासितांच्या छावणीवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात 45 नागरिक ठार झाल्याचा दावा हमासने केला. या हल्ल्यावरुन इस्त्रायलवर जगभरातून टीका होत असताना बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेस दुःखद घटना म्हटले. त्याचवेळी, या हल्ल्यानंतर लगेचच आयडीएफने दावा केला होता की त्यांनी केवळ हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात आयडीएफने यासिन राबिया आणि खालेद नज्जर या दोन हमास कमांडरांना ठार मारल्याचा दावा केला.
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर पाच हजार रॉकेट डागले. यासोबतच हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून सुमारे 250 लोकांना ओलीस ठेवले. हमासच्या या हल्ल्यात सुमारे 1200 इस्त्रायली नागरिक मारले गेले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध सुरु केले. इस्रायल आणि हमास यांच्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या युद्धविराम करारात अनेक ओलीसांची सुटका करण्यात आली, मात्र डझनभर ओलीस अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. हमासचा खात्मा होईपर्यंत युद्ध सुरुच राहील, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.