
इस्त्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु असताना इस्त्रायलने शनिवारी (10 मे) गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे 23 पॅलेस्टिनींना जीव गमवावा लागला, ज्यात तीन मुलांसह त्यांच्या पालकांचा समावेश आहे. गाझाला मदत पोहोचवण्यावर नियंत्रण ठेवण्याच्या इस्रायली योजनांबाबत आंतरराष्ट्रीय इशारे वाढत असताना ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी, शुक्रवारी रात्री उशिरा जबालिया येथे झालेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीच्या गोदामाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता.
इस्रायली लष्कराने सांगितले की, गाझा शहरातील शुजैया भागात शोध मोहिमेदरम्यान विस्फोटक यंत्राचा स्फोट झाल्याने त्यांचे नऊ सैनिक जखमी झाले. तथापि, इस्रायलच्या नाकेबंदीमुळे गाझातील (Gaza) परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. स्वयंपाकघरे आणि मदत केंद्रे बंद केली जात आहेत. तसेच, अन्नधान्याचा साठा संपत चालला आहे.
त्याचवेळी, इस्रायलचे म्हणणे आहे की हमासवर (Hamas) दबाव निर्माण करण्यासाठी इस्त्रायलकडून ही पावले उचलली जात आहेत, जेणेकरुन त्यांना ओलिसांना सोडण्यास आणि शस्त्रे ठेवण्यास भाग पाडता येईल. तर मानवाधिकार संघटना इस्त्रायलच्या या निर्णयाकडून उपासमारीचे शस्त्र आणि संभाव्य युद्ध गुन्हा म्हणून पाहत आहेत. तथापि, संयुक्त राष्ट्रासह अनेक संघटनांनी जीवनावश्यक मदत पोहोचवण्यावर नियंत्रण ठेवण्याच्या इस्रायलच्या योजनेचा निषेध केला आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या मते, या युद्धात आतापर्यंत 52,800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक महिला आणि मुले आहेत. 1 लाख 19 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे, इस्रायलने हजारो दहशतवाद्यांना मारल्याचा दावा केला, मात्र त्यांना यासंबंधी कोणत्याही स्वरुपाचा पुरावा देता आला नाही.
18 मार्च रोजी इस्रायलने हमाससोबतच्या दोन महिन्यांच्या युद्धविरामाचा भंग करुन गाझावर पुन्हा बॉम्बहल्ला सुरु केला. इस्त्रायली सैन्याने अर्ध्याहून अधिक प्रदेश ताब्यात घेतला असून महिन्यांपासून सुरु असलेल्या इस्रायली कारवाईमुळे गाझाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे.
7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने हमासला समूळ नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी सुमारे 1,200 लोकांचा बळी घेतला, त्यातील बहुतेक नागरिक होते. तर 250 हून अधिक लोकांचे अपहरण केले. हमासकडे अजूनही सुमारे 59 ओलिस आहेत, ज्यापैकी सुमारे एक तृतीयांश अजूनही जिवंत असल्याचा अंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.