

IRGC Navy Chief Alireza Tangsiri Killed: मध्य पूर्वेत सुरु असलेल्या भीषण युद्धाला आता अत्यंत अनपेक्षित वळण मिळाले. इस्रायलने केलेल्या एका धडाकेबाज कारवाईत इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' चे नौदल प्रमुख अलीरेझा तांगसिरी मारले गेल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला. दक्षिण इराणमधील मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या 'बंदर अब्बास' बंदराजवळ हा हल्ला करण्यात आला. अलीरेझा तांगसिरी हे इराणच्या सागरी लष्करी शक्तीचे सर्वेसर्वा मानले जात होते. या युद्धात आतापर्यंत इराणने गमावलेला हा सर्वात मोठा लष्करी चेहरा असल्याचे बोलले जात आहे.
इराणकडे दोन स्वतंत्र नौदले आहेत- एक अधिकृत सरकारी नौदल आणि दुसरे म्हणजे अत्यंत शक्तिशाली मानले जाणारे IRGC नौदल. यापैकी IRGC नौदलाची संपूर्ण धुरा तांगसिरी यांच्या खांद्यावर होती. विशेषतः 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' या जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या असलेल्या सागरी मार्गाची नाकेबंदी करण्यात तांगसिरी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. याच मार्गावरुन जगातील सुमारे 20 टक्के खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचे संकट ओढवले असतानाच, या नाकेबंदीचे मुख्य सूत्रधार असलेल्या तांगसिरी यांचा अंत होणे हा इराणसाठी मोठा धोरणात्मक धक्का मानला जात आहे.
हा हल्ला ज्या 'बंदर अब्बास' भागात झाला, तो भाग पर्शियन खाडीला जगातील इतर शिपिंग मार्गांशी जोडणारा मुख्य दुवा आहे. इराण सध्या या जलमार्गावर आपले पूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असतानाच तांगसिरी यांच्या मृत्यूची बातमी आली आहे. इराणकडून अद्याप या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. यापूर्वी जानेवारी 2026 मध्येही त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या, ज्या इराणने फेटाळून लावल्या होत्या. मात्र, यावेळी इस्रायली लष्कराने अत्यंत खात्रीशीररीत्या या वृत्ताला दुजोरा दिला.
दुसरीकडे, होर्मुझची खाडी पुन्हा खुली करण्यासाठी अमेरिकेनेही आक्रमक पवित्रा घेतला. अमेरिकेने सुमारे 4,700 मरीन कमांडो आणि दोन शक्तिशाली युद्धनौका मध्य पूर्वेकडे रवाना केल्या आहेत. या युद्धनौका येत्या शुक्रवारपर्यंत या भागात पोहोचण्याची शक्यता आहे. तांगसिरी यांच्या मृत्यूमुळे इराण आता अधिक आक्रमक होऊन प्रत्युत्तर देणार की आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे आखाती देशांमधील युद्धाचा भडका अधिकच उडण्याची चिन्हे दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.