Israel-Hamas War: हमासच्या 24 पैकी 17 बटालियन उद्ध्वस्त! दहशतवादी कॅम्प ताब्यात; नेतन्याहू म्हणाले...

Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला चार महिने पूर्ण होत आहेत.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला चार महिने पूर्ण होत आहेत. मात्र दोन्ही बाजूंनी सतत हल्ले सुरुच आहेत. इस्रायली सैन्याने उत्तर आणि दक्षिण गाझामध्ये कहर केला आहे. यामध्ये केवळ हमासचे दहशतवादीच मारले जात नाहीत, तर त्यांच्यासोबत सामान्य लोकही मारले जात आहेत. दरम्यान, इस्रायलच्या संरक्षण दलाने हमासचे लपण्याचे ठिकाण शोधून काढल्याचा दावा केला आहे, जिथे 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या तळावर हमास कमांडर मोहम्मद सिनवार याचेही कार्यालय होते. येथे मोठ्या प्रमाणात रॉकेट आणि शस्त्रे ठेवण्यात आली होती. दरम्यान, आयडीएफसाठी हे मोठे यश मानले जात आहे.

दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाने त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामध्ये आयडीएफचे सैनिक बोगद्यात शिरताना दिसत आहेत. यासोबतच लक्झरी सुविधांनी सुसज्ज खोल्या, प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि रॉकेट बोगद्याच्या आत पाहायला मिळतात. या बोगद्यांमध्ये चिलखती वाहने जाण्याचीही सोय आहे. आयडीएफचा दावा आहे की, हमासने या ठिकाणी आपल्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. यानंतर त्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या किबुत्झ शहरावर भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात 1200 हून अधिक लोक मारले गेले होते. यासोबतच सुमारे 250 लोकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. तेव्हापासून युद्ध सुरु आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धात मुलांचे जीवन उद्ध्वस्त, 17 हजार अनाथ; 12000 मरण पावले

ताज्या घडामोडीत, रविवारी गाझाच्या देर अल-बालाहमध्ये इस्रायली हल्ल्यानंतर गोंधळ उडाला. या हल्ल्यात 15 जणांना जीव गमवावा लागला, तर 45 जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तिथे पुरेशा सुविधा नसल्याने जखमींवर उपचार करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हे युद्ध थांबवण्याची मागणी लोकांकडून होत आहे. पण इस्रायल थांबायचं नाव घेत नाहीये. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मोठा दावा केला की, हमासच्या 24 पैकी 17 बटालियन पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यांच्या मते, हमासच्या उर्वरित बटालियन दक्षिण गाझामध्ये आहेत. त्यांच्यावरही लष्करी कारवाई सुरु आहे.

असा दावा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, ''आमचे पहिले आणि प्रमुख लक्ष्य हमासचा नायनाट करणे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हमासच्या बटालियनला उखडून टाकण्याची गरज आहे. आजपर्यंत आम्ही 24 पैकी 17 बटालियन पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या आहेत. उर्वरित बटालियनपैकी बहुतेक दक्षिण गाझा आणि रफाह येथे आहेत. आम्ही लवकरच त्यांच्यावर लष्करी कारवाई करणार आहोत.'' मात्र नेतन्याहू यांना त्यांच्याच घरात विरोध होत आहे. लोक त्यांच्या सरकारवर टीका करत आहेत आणि युद्ध संपवण्याची मागणी करत आहेत. इस्रायली ओलीसांच्या कुटुंबीयांनी रविवारी तेल अवीवमधील संरक्षण मंत्रालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी ओलिसांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली.

Israel-Hamas War
Israel Hamas War: युद्धबंदीचे प्रयत्न निष्फळ! गाझामध्ये लढाई थांबेना, 24 तासांत 150 पॅलेस्टिनींचा मृत्यू

या निदर्शनादरम्यान नेतन्याहू मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक घेत होते. ओलिसांच्या सुटकेबाबत हमाससोबत करार करण्याच्या प्रस्तावांवर बैठक बोलावण्यात आली होती. दुसरीकडे, एका महत्त्वाच्या घडामोडीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन हे देखील मध्य पूर्व दौऱ्यावर आहेत. 7 ऑक्टोबर रोजी सुरु झालेल्या युद्धानंतर ब्लिंकनचा हा पाचवा मध्यपूर्व दौरा आहे. या काळात सौदी अरेबिया, इजिप्त, कतार, इस्रायल आणि वेस्ट बँक या देशांना भेट देण्याची त्यांची योजना आहे.

अमेरिकेच्या मते, गाझाला मानवतावादी मदत पुरवणे ही प्राथमिकता आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धाला आता चार महिने पूर्ण होत असून अद्यापही ते संपण्याची चिन्हे दिसत नाहीत, हे जगासाठी चिंतेचे कारण आहे. संयुक्त राष्ट्रालाही याची चिंता आहे.

दरम्यान, गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. इस्रायली सैन्य गाझामधील हमासच्या ठिकाणांना निवडकपणे लक्ष्य करत आहे. आयडीएफ सैनिक घरांमध्ये आणि बोगद्यांमध्ये घुसून प्रचंड हल्ले करताना दिसतात. आयडीएफने फोटो आणि व्हिडिओ जारी केले असून या हल्ल्यात हमासचे अनेक लक्ष्य नष्ट केल्याचा दावा केला आहे. त्यात हमासचा मोठा भाग उद्ध्वस्त करण्याबाबत बोलले जाते. या हल्ल्यांमुळे 85 टक्के लोकसंख्या विस्थापित झाली आहे.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: हमासचा अंत, नेतन्याहूंचे ध्येय: हिटलरच्या आत्मचरित्राची अरबी प्रत दाखवत बेंजामिन म्हणाले...

दुसरीकडे, इस्रायली लष्कर हमासच्या दहशतवाद्यांच्या तसेच हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करत आहे. यावेळी आयडीएफने हिजबुल्लाच्या निरीक्षण चौक्या आणि लष्करी कमांड सेंटरला लक्ष्य करुन हवाई हल्ले केले. इस्त्रायली सैन्य दक्षिण गाझामधील रफाहमध्येही हल्ले करत आहे. राफाहमध्ये इस्रायलच्या रॉकेट हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत, तर अनेक इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याचा बळी जात असल्याने येथील लोकांनी युद्ध बंद करण्याची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com