

Iran Enriched Uranium Controversy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत केलेल्या दाव्याचा इराणने कडाडून निषेध केला असून आपले समृद्ध युरेनियम कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या देशाला सोपवण्यास साफ नकार दिला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बागई यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावताना एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले. "समृद्ध युरेनियम साठा हा आमच्यासाठी इराणच्या मातीसारखाच पवित्र आहे आणि त्याचे कोठेही किंवा कोणाकडेही स्थलांतर केले जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले. इराणने आपली ही भूमिका स्पष्ट केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आता एका नव्या वळणावर पोहोचला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच असा दावा केला होता की, इराणने आपला समृद्ध युरेनियमचा साठा अमेरिका किंवा एखाद्या तिसऱ्या देशाकडे सोपवण्यास संमती दर्शवली आहे. मात्र, इराणने हा दावा केवळ खोटाच नाही तर पूर्णपणे आधारहीन असल्याचे म्हटले. इराणच्या मते, युरेनियम संवर्धन हे त्यांच्या देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. बाह्य दबावाखाली येऊन किंवा कोणत्याही तडजोडीच्या नावाखाली आपल्या राष्ट्रीय प्रतिष्ठेशी तडजोड करणार नाही, अशी भूमिका तेहरानने घेतली. ट्रम्प प्रशासनाकडून पसरवली जाणारी ही माहिती म्हणजे केवळ इराणवर दबाव निर्माण करण्यासाठी सुरु असलेले 'मानसिक युद्ध' असल्याचे बागई यांनी म्हटले.
सध्या अमेरिका (America) आणि इराणमधील युद्धविराम अत्यंत नाजूक स्थितीत आहे. ट्रम्प यांनी इराणला नवीन धमकी दिली असून जर कायमस्वरुपी करार झाला नाही, तर युद्धविराम पुढे वाढवला जाणार नाही आणि नाकेबंदी सुरुच राहील, असे संकेत दिले. या धमकीला उत्तर देताना इराणने पुन्हा एकदा होर्मुजच्या सामुद्रधुनीचे अस्त्र उपसले आहे. इराणने स्पष्ट केले की, शांततापूर्ण कारणांसाठी युरेनियम संवर्धन करणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे, जो 'अणुप्रसार बंदी करारांतर्गत सुरक्षित आहे. त्यामुळे नाकेबंदी सुरु राहिल्यास होर्मुजचा मार्ग पुन्हा एकदा जहाजांसाठी पूर्णपणे बंद केला जाईल, असा इशारा इराणने दिला.
इराणच्या (Iran) या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिकेचे लष्करी आणि कूटनीतिक प्रयत्न सध्या तरी अपयशी ठरताना दिसत आहेत. इराणने स्पष्ट संदेश दिला की, ते कोणत्याही दबावाखाली आपल्या अण्वस्त्र अधिकारांचा त्याग करणार नाहीत. इराणसाठी युरेनियम हा केवळ तांत्रिक विषय नसून तो त्यांच्या राष्ट्रीय अभिमानाचा मुद्दा बनला आहे. यामुळे येणाऱ्या काळात जागतिक राजकारणात आणि विशेषतः मध्यपूर्वेतील परिस्थितीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेने नाकेबंदी आणि लष्करी दबाव वाढवला तरी इराण आपल्या 'पवित्र' युरेनियमची आणि मातीची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या निवेदनातून स्पष्ट झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.