

Iran EU Naval Air Force Terrorist Declaration: ईराणने एक अत्यंत आक्रमक आणि धाडसी पाऊल उचलत युरोपियन युनियनच्या (EU) सदस्य राष्ट्रांच्या नौदलाला आणि हवाई दलाला थेट 'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केले. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि पाश्चिमात्य देशांशी असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ईराणचा हा निर्णय जागतिक राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला आहे.
हा निर्णय 2019 मध्ये युरोपियन युनियनने ईराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) ला दहशतवादी संघटना म्हणून मान्यता दिली होती, त्याला दिलेले एक चोख प्रत्युत्तर मानले जात आहे. ईराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा करताना स्पष्ट केले की, युरोपियन युनियनची आयआरजीसी विरुद्धची कृती ही संयुक्त राष्ट्रांची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांच्या पूर्णपणे विरोधात होती. त्यामुळेच ईराणने आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि पाश्चिमात्य दबावापुढे न झुकता हा ठोस निर्णय घेतला.
ईराणने (Iran) आपल्या निर्णयाचे समर्थन करताना 2019 मध्ये संमत केलेल्या एका विशेष कायद्याच्या कलम 7 चा दाखला दिला आहे. हा कायदा अमेरिकेने आयआरजीसीला दहशतवादी घोषित केल्याच्या निषेधार्थ आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तयार करण्यात आला होता. ईराणच्या मते, जे देश किंवा संघटना अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवून आयआरजीसीला दहशतवादी ठरवतील, त्या सर्वांविरुद्ध ईराण अशाच प्रकारची 'पारस्परिक कारवाई' करेल.
या निर्णयामुळे आता युरोपियन युनियनच्या लष्करी तुकड्यांना ईराणच्या नजरेत आयसिस आणि अल-कायदा यांसारख्या कुप्रसिद्ध दहशतवादी गटांच्या श्रेणीत स्थान मिळाले आहे. ही केवळ एक तांत्रिक घोषणा नसून यामुळे आखाती प्रदेशात आणि विशेषतः सागरी सीमांवर ईराण आणि युरोपियन राष्ट्रांच्या लष्करी दलांमध्ये थेट संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयआरजीसी ही ईराणमधील केवळ एक लष्करी तुकडी नसून ती देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सशस्त्र दलांवर प्रभाव ठेवणारी एक शक्ती आहे. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर शिया धार्मिक व्यवस्थेच्या रक्षणासाठी या दलाची स्थापना करण्यात आली होती. सध्या ईराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि अण्वस्त्र उपक्रमांची संपूर्ण देखरेख आयआरजीसीकडेच आहे.
दुसरीकडे, अमेरिका (America), इस्रायल आणि त्यांचे मित्र देश ईराणवर युरेनियम संवर्धन मोहीम थांबवण्यासाठी सातत्याने दबाव टाकत आहेत. ईराण अण्वस्त्रे तयार करत असल्याचा दावा पाश्चिमात्य देशांकडून केला जात असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणला कडक इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ईराणला पुढील 10 ते 15 दिवसांत अणुकराराबाबत अमेरिकेसोबत तडजोड करण्यास सांगितले असून, तसे न झाल्यास त्याचे परिणाम 'दुर्दैवी' असतील अशी उघड धमकी दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील वातावरण युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.