भारतीय वंशाचे ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे त्यांच्या पत्नीच्या इन्फोसिसमधील हिस्सेदारीवरून वादात सापडले आहेत. खरे तर युक्रेनवरील हल्ल्याबाबत ब्रिटन, अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय कंपनी इन्फोसिस रशियामध्ये आपले काम सुरू ठेवत आहे. ऋषी सुनक यांचे सासरे नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहेत आणि ऋषी यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची या कंपनीत भागीदारी आहे. या प्रकरणाबाबत ऋषी सुनक यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले की, एकीकडे ते रशियावर कठोर निर्बंध घालण्याबाबत बोलत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच घरात त्यांचे म्हणणे मान्य केले जात नाही. (indian origin british minister rishi sunak son in law of sudha murty)
एका पत्रकाराने ऋषी सुनक यांना विचारले, 'तुमच्या कुटुंबाचे रशियाशी संबंध असल्याच्या बातम्या येत आहेत. तुमच्या पत्नीची भारतीय सल्लागार कंपनी इन्फोसिसमध्ये भागीदारी आहे. इन्फोसिसचा बिझनेस रशियात सुरू आहे, त्यांचे तिथे ऑफिसही आहे, डिलिव्हरी ऑफिसही आहे. कंपनीचे मॉस्को (रशियाची राजधानी) येथील अल्फा बँकेशीही कनेक्शन आहे. पत्रकार पुढे म्हणाले, 'तुम्ही तुमच्या घरातील इतरांना जे सल्ले देत आहात ते तुम्ही पाळत नाही का?' उत्तरात सुनक यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की, रशियावरील निर्बंधांबाबत आपण निवडून आलेले राजकारणी म्हणून आपली बाजू मांडत आहोत. त्यांची पत्नी निवडून आलेली नेता नाही.
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या पत्नीचे इन्फोसिसमध्ये (Infosys) शेअर्स आहेत आणि ती ब्रिटनची निवडून आलेली खासदार नाही. ते म्हणाले, 'इन्फोसिसच्या व्यवसायाबाबत माझी कोणतीही जबाबदारी नाही. मी निवडून आलेला नेता आहे आणि मी ज्या कामासाठी जबाबदार आहे त्या कामावर चर्चा करण्यासाठी मी येथे आलो आहे.''
त्यांच्या उत्तरावर पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सरकारचा फायदा आपल्या कुटुंबाला होतो आहे, असे त्यांना वाटत नाही का? त्यावर सुनकने उत्तर दिले, 'असे काही आहे असे मला वाटत नाही. कंपन्या कशा पद्धतीने काम करतात यावर ते अवलंबून असते. आम्ही रशियावर (Russia) महत्त्वपूर्ण निर्बंध लादले आहेत. आम्ही ज्या कंपन्यांसाठी जबाबदार आहोत त्या सर्व रशियावर लादलेल्या निर्बंधांचे पालन करत आहेत. पुतीन यांच्या आक्रमकतेने कठोर संदेश द्यायला हवा. इन्फोसिसने रशियामधील व्यापारावर स्पष्टीकरण दिले आहे इन्फोसिसच्या एका निवेदनात म्हटले आहे की ते रशिया आणि युक्रेनमधील शांतता पुनर्स्थापित करण्यास समर्थन देते.
कठीण काळात, युक्रेनला पाठिंबा देणे हे इन्फोसिसचे प्रमुख प्राधान्य
इन्फोसिसने माहिती दिली की त्यांच्याकडे रशियामध्ये काम करणारी एक छोटी टीम आहे जी काही जागतिक ग्राहकांना स्थानिक पातळीवर सेवा देते. इन्फोसिसने स्पष्ट केले की स्थानिक रशियन उद्योगांशी त्यांचे कोणतेही सक्रिय व्यावसायिक संबंध नाहीत. "या कठीण काळात, युक्रेनला (Ukraine) पाठिंबा देणे हे इन्फोसिसचे प्रमुख प्राधान्य आहे," असे निवेदनात म्हटले आहे. युक्रेनमधील युद्धग्रस्तांना कंपनी दहा लाख अमेरिकन डॉलर्सची मदत देत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.