
Australia Virus: चीनमधून लिक झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार उडवून दिला होता. आताही अशीच काहीशी घटना ऑस्ट्रेलियामधून समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील प्रयोगशाळेतून शेकडो प्राणघातक विषाणूचे नमुने गहाळ झाल्याचे क्वीन्सलँड सरकारने सोमवारी सांगितले. ऑनलाइन मीडिया स्टेटमेंटनुसार, सरकारने ऑस्ट्रेलियाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला हे "जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे मोठे उल्लंघन" असल्याचे सांगत चौकशी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
क्वीन्सलँडच्या पब्लिक हेल्थ व्हायरोलॉजी प्रयोगशाळेतून ऑगस्ट 2023 मध्ये हेन्ड्रा व्हायरस, लिसाव्हायरस आणि हंताव्हायरससह- एकाधिक संसर्गजन्य विषाणूंच्या 323 कुपी बेपत्ता झाल्या आहेत. हेन्ड्रा हा एक झुनोटिक (प्राण्यापासून मानवापर्यंत) विषाणू आहे, जो फक्त ऑस्ट्रेलियामध्ये आढळला आहे. तर हंताव्हायरस हा विषाणूंची एक फॅमिली आहे, ज्यामुळे गंभीर आजार आणि मृत्यू होऊ शकतो.
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, लिसाव्हायरस हा ही विषाणूंची फॅमिली आहे, ज्यामुळे रेबीज होऊ शकतो. "जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन आणि संसर्गजन्य विषाणूचे नमुने संभाव्यत: गहाळ झाल्याने, क्वीन्सलँड हेल्थ सेंटरमध्ये असे काय घडले आणि ते पुन्हा होण्यापासून कसे रोखायचे याचा तपास करणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया मंत्री टिमोथी निकोल्स यांनी दिली.
निकोल्स पुढे म्हणाले की, ''क्वीन्सलँड हेल्थने ठोस उपाय केले आहेत, ज्यात आवश्यक नियमांनुसार कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षित करणे आणि सामग्रीचे योग्य स्टोरेज सुनिश्चित करण्यासाठी ऑडिट करणे समाविष्ट आहे.''
तर दुसरीकडे, बोस्टनमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमधील एआय आणि लाइफ सायन्सेसचे संचालक सॅम स्कार्पिनो यांनी म्हटले की, ऑस्ट्रेलियातील ही घटना "जैवसुरक्षिततेच्या बाबतीतील गंभीर चूक" आहे.
ते पुढे म्हणाले की, "काही हंताव्हायरसमध्ये मृत्यूचे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत आहे, किंवा COVID-19 पेक्षा 100 पट जास्त प्राणघातक आहे. या रोगजनकांपासून प्राणी आणि पशुधनांनाही मोठा धोका आहे.''
लिसाव्हायरस फॅमिलीत रेबीज विषाणू आहे, जो वेळेत उपचार न मिळाल्यास मानवांसाठी प्राणघातक ठरतो, असे तज्ञांनी नमूद केले आहे. स्कार्पिनो शेवटी म्हणाले की, "यापैकी कोणत्याही रोगजनकांची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित करण्याची मर्यादित क्षमता लक्षात घेता, महामारीचा धोका खूप कमी आहे.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.