

Hamas Commander Samir Abu Younis Killed: गाझामध्ये सुरु असलेल्या संघर्षात हमासला आणखी एक मोठा धक्का बसला असून, हमासच्या 'अल-कसाम ब्रिगेड'ने रविवारी (15 नोव्हेंबर) एका अधिकृत निवेदनाद्वारे त्यांच्या राफा ब्रिगेडचा कमांडर समीर महमूद अबू यूनिस याच्या मृत्यूची पुष्टी केली. अल-कसाम ब्रिगेडच्या माहितीनुसार, खान युनिसच्या अल-मवासी भागात झालेल्या भीषण इस्रायली हवाई हल्ल्यात हा वरिष्ठ कमांडर मारला गेला. समीर महमूद अबू यूनिस हा हमासच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा 'जनरल मिलिट्री काउन्सिल'चा सदस्य देखील होता.
दुसरीकडे, इस्रायली सैन्याने सुरक्षा एजन्सी 'शिन बेट'च्या संयुक्त विद्यमानाने राबवलेल्या एका विशेष लष्करी मोहिमेत हमासच्या एका वरिष्ठ सदस्याला लक्ष्य केल्याची पुष्टी केली, जरी इस्रायली निवेदनात सुरुवातीला मृत व्यक्तीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. नासेर मेडिकल कॉम्प्लेक्सने दिलेल्या माहितीनुसार, या ड्रोन हल्ल्यात एका पॅलेस्टिनीचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, अबू यूनिस याच्या आधी राफा ब्रिगेडची धुरा नाएल अबू ओबैद याच्याकडे होती, जो यापूर्वी 15 सप्टेंबर रोजी झालेल्या इस्रायली हल्ल्यातच मारले गेला होता.
दरम्यान, या दीर्घकाळ चाललेल्या आणि अत्यंत विध्वंसक संघर्षात मानवी हानीचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. गाझाच्या (Gaza) आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये सुरु झालेल्या या इस्रायली लष्करी मोहिमेत आतापर्यंत 74 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला, तर 1 लाख 76 हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये महिला व लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले.
या संपूर्ण युद्धाने गाझाचे 90 टक्क्यांहून अधिक पायाभूत सुविधांचे जाळे पूर्णपणे उद्धव्वस्त केले असून, संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार या उद्ध्वस्त झालेल्या भूमीच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल 71.4 अब्ज डॉलर्स इतक्या प्रचंड निधीची आवश्यकता भासणार आहे, ज्यामुळे मध्यपूर्वेतील ही मानवी आपत्ती अधिकच गंभीर बनली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.