
Gaza Street Execution Video: इस्रायलसोबत अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामानंतर गाझामध्ये आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी हमासने (Hamas) क्रूर पाऊले उचलण्यास सुरुवात केली. गाझामध्ये आपली सत्ता कायम ठेवण्याच्या प्रयत्नात हमासकडून सार्वजनिक स्तरावर लोकांचे शिरच्छेद केले जात आहेत.
यासंबंधीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हमास गाझामध्ये इतर सशस्त्र पॅलेस्टिनी गटांशी संघर्ष करुन आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हमासच्या क्रूरतेची साक्ष देत आहे.
हमासच्या या क्रूरतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. सोमवार संध्याकाळच्या या व्हिडिओमध्ये हमासने 'इस्रायलचे सहयोगी आणि बेकायदेशीर' ठरवलेल्या आठ जणांना रस्त्यावर सार्वजनिकरित्या गोळ्या घालून ठार केले. व्हायरल झालेल्या अत्यंत हिंसक फुटेजमध्ये वाईटरित्या मारहाण झालेले आठ जण डोळ्यांवर पट्टी बांधून रस्त्यावर गुडघे टेकून बसलेले दिसत आहेत. त्यानंतर हसामच्या बंदूकधाऱ्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. त्याचवेळी, उपस्थित जमावाकडून 'अल्लाहु अकबर' च्या घोषणा दिल्या गेल्या. हमासने एका निवेदनात कोणतेही पुरावे न देता, पीडितांना "गुन्हेगार आणि इस्रायलचे सहयोगी" ठरवले.
इस्रायली सैन्याने माघार घेतल्यानंतर हमासने गाझामध्ये आपले नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. संघर्ष काळात मजबूत झालेल्या 'टोळ्या' (Clans) किंवा सशस्त्र गटांना हमास लक्ष्य करत आहे.
युद्धविराम सुरु असताना हमासने पुन्हा क्रूरता दाखवण्यास सुरुवात केली. तसेच, हमासने सशस्त्र गटांशी संघर्ष सुरु केला आहे. इस्रायली सैन्याने गाझातून (Gaza) माघार घेतल्यामुळे हमास-प्रशासित पोलिसांच्या पथकांनी गस्त घालण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. इस्रायली सैन्याने गाझातील मोठे क्षेत्र ताब्यात घेतल्यानंतर आणि हमासच्या सुरक्षा दलांना लक्ष्य केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून हे पोलीस दल सक्रिय नव्हते.
दरम्यान, इस्रायली सैन्याने माघार घेतलेल्या भागांमध्ये शक्तिशाली स्थानिक कुटुंबे आणि सशस्त्र टोळ्या, ज्यात इस्रायलने पाठिंबा दिलेल्या काही हमास विरोधी गटांचा समावेश होता त्यांना हमासने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यापैकी अनेक टोळ्यांवर मानवतावादी मदत लुटणे तसेच गाझामधील उपासमारीच्या संकटात भर घालणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. गाझाच्या खासगी ट्रकर्स युनियनचे प्रमुख नहेद शेहेबर यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, हमास अशा टोळ्यांविरुद्ध कारवाई करत आहे, ज्यांनी इस्रायली नियंत्रणाखालील भागात लोकांना त्रास दिला.
तर दुसरीकडे, जोपर्यंत हमासचे (Hamas) विघटन होत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या युद्धविराम योजनेत हमासने गाझातील सत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर निरीक्षित संस्थेकडे सोपवण्याची अट आहे. मात्र हमासने अजूनही त्या अटी पूर्णपणे स्वीकारलेल्या नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.