French President Emmanuel Macron Viral Video: फ्रान्समध्ये 17 वर्षीय नाहेलची पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर तिथे चौथ्या दिवशीही हिंसाचार सुरूच आहे. स्काय न्यूजनुसार, आंदोलक आता बंदुकीच्या दुकानांत लूट करत आहेत. शुक्रवारी दंगल पसरवल्याप्रकरणी एक हजार लोकांना अटक करण्यात आली.
सरकारने शुक्रवारी रात्री 45,000 पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रस्त्यावर तैनात केले. देशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होत असताना राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
देशात सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मॅक्रॉन ब्रिटीश गायक एल्टन जॉनच्या कॉन्सर्टचा आनंद लुटतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सीएनएननुसार, बुधवारी पॅरिसमध्ये एल्टनचा एक कॉन्सर्ट होता ज्यामध्ये मॅक्रॉन आपल्या पत्नीसोबत सहभागी झाले होते.
या कॉन्सर्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एल्टनच्या पतीनेही मॅक्रॉनसोबतचा एक फोटो पोस्ट केला.
ट्रॅफिक सिग्नलवर थांबला नाही म्हणून 27 जून रोजी नहेल या 17 वर्षीय मुलाची पोलिसांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून फ्रान्समध्ये हिंसाचार सुरूच आहे. आज (शनिवारी) नहेलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या हत्येसाठी मी संपूर्ण पोलीस दलाला जबाबदार धरते, असे नहेलच्या आईने म्हटले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, आंदोलनकर्त्यांनी फ्रान्समध्ये 500 हून अधिक इमारतींचे नुकसान केले आहे. याशिवाय सुमारे 4 हजार ठिकाणी जाळपोळीच्या घटनांमध्ये 2 हजारांहून अधिक गाड्या जळून खाक झाल्या आहेत. फ्रेंच हिंसाचाराची आग बेल्जियममध्येही पोहोचली आहे. फ्रेंच मीडियानुसार, राजधानी ब्रसेल्समध्ये हिंसाचार पसरवल्याप्रकरणी 100 जणांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनीही देशात आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली. फ्रान्समधील एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, देशात शांतता प्रस्थापित करणे आमची प्राथमिकता आहे. यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास तयार आहोत. 14 जुलै रोजी फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिन साजरा केला जाणार आहे. असे पंतप्रधान एलिझाबेथ म्हणाल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.