
Jair Bolsonaro Sentenced To 27 Years: ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना मोठा झटका दिला. त्यांना सत्तापालटाचा कट रचल्याच्या आरोपाखाली तब्बल 27 वर्षे आणि 3 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापैकी चार न्यायाधीशांनी त्यांना दोषी ठरवले. 70 वर्षीय बोल्सोनारो यांनी 2022 च्या निवडणुकीतील पराभवानंतर नवे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लूला दा सिल्वा यांचे सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) या निर्णयानंतर ब्राझीलसह जगभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्तापालटाच्या या कटासाठी कमाल 43 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकली असती, मात्र बोल्सोनारो यांचे वय आणि त्यांची प्रकृती लक्षात घेऊन ही शिक्षा कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या बोल्सोनारो यांना घर नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून ते या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या 11 न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठासमोर अपील करणार आहेत.
दरम्यान, या प्रकरणात बोल्सोनारो हे केवळ सत्तापालटाच्या कटात सहभागी नव्हते, तर त्यांच्यावर तीन प्रमुख व्यक्तींच्या हत्येचाही कट रचल्याचा गंभीर आरोप होता. ब्राझीलच्या सैन्यात माजी कॅप्टन राहिलेल्या बोल्सोनारो यांना 'गुन्हेगारी संघटनेचे' नेतृत्व केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. या संघटनेचा उद्देश 2023 मध्ये लूला यांना पदभार स्वीकारण्यापासून रोखणे हा होता. या कटात केवळ सरकार पाडण्याचाच नाही, तर राष्ट्राध्यक्ष लूला, उपाध्यक्ष गेराल्डो अल्कमिन आणि न्यायमूर्ती अलेक्झांडर डी मोरेस यांची हत्या करण्याचाही कट होता.
सत्तापालटाचा प्रयत्न करणे.
एका सशस्त्र गुन्हेगारी संघटनेचा भाग असणे.
हिंसेच्या माध्यमातून लोकशाही कायद्याची व्यवस्था संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणे.
हिंसेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणे.
आणि राज्याच्या मालमत्तेला गंभीर धोका निर्माण करणे. या सर्व आरोपांवरुन न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले.
बोल्सोनारो यांना यापूर्वीच एका वेगळ्या प्रकरणात 2030 पर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या समर्थकांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. आता या शिक्षेनंतर त्यांची राजकीय वाटचाल अधिकच खडतर झाली आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, बोल्सोनारो हे पुढील वर्षी एखाद्या उत्तराधिकाऱ्याला तयार करु शकतात, जो लूला दा सिल्वा यांना पुढील निवडणुकीत आव्हान देईल.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ब्राझीलच्या लोकशाहीसाठी एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे. या निर्णयातून हे स्पष्ट होते की, देशातील कोणत्याही व्यक्तीने लोकशाही (Democracy) प्रक्रियेला आव्हान दिल्यास त्याला कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल. या प्रकरणावर जगभरातील देशांचे लक्ष आहे, कारण याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणातही उमटू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.