

भारतीय रेल्वेबद्दल अनेकदा परदेशात नकारात्मक चर्चा ऐकायला मिळते, विशेषतः स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत विदेशी पर्यटकांच्या मनात साशंकता असते. मात्र, एका विदेशी तरुणीने नुकताच केलेला भारतीय रेल्वेचा प्रवास या सर्व समजांना छेद देणारा ठरला आहे. इनेस फारिया नावाच्या २५ वर्षीय तरुणीने भारतातील 'स्लीपर क्लास'मध्ये रात्रभर प्रवास केला आणि त्यानंतर तिने शेअर केलेला अनुभव सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
इनेस फारिया ही जगभ्रमंती करण्यासाठी आपली नोकरी सोडून भारतात आली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तिने आपल्या प्रवासाचे वर्णन केले आहे. इनेस सांगते की, रेल्वे प्रवासापूर्वी तिच्या मनात खूप भीती होती.
भारतीय रेल्वे म्हणजे गोंधळ, प्रचंड गर्दी आणि अस्वच्छता असेच चित्र तिच्या डोळ्यासमोर होते. रेल्वेतील शौचालयांची अवस्था वाईट असेल, असा तिचा ठाम समज होता. मात्र, प्रवासादरम्यान जे काही घडले, ते तिच्या कल्पनेपलीकडचे होते.
इनेस आपल्या मैत्रिणीसोबत स्लीपर कोचमध्ये चढली. तिला सर्वात जास्त आश्चर्य वाटले ते रेल्वेतील स्वच्छतेचे. तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "मला वाटले होते त्यापेक्षा रेल्वे खूपच स्वच्छ होती. आम्हाला रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छ चादरी आणि ब्लँकेट देण्यात आले.
जरी आमचे सामान जास्त असल्याने जागा थोडी कमी वाटत होती, तरीही तो अनुभव सुखद होता." विशेष म्हणजे, ज्या शौचालयाबाबत तिला भीती होती, त्याची स्थितीही समाधानकारक असल्याचे तिने नमूद केले. "प्रवासात मला इतकी शांत झोप लागली की मी सर्व चिंता विसरून गेले," असेही तिने आवर्जून सांगितले.
इनेसचा हा व्हिडिओ व्हायरल होताच हजारो भारतीयांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले की, "एका विदेशी पर्यटकाने माझ्या देशाचा असा सकारात्मक अनुभव शेअर करणे खरोखरच कौतुकास्पद आहे.
तुमचे भारतात स्वागत आहे!" तर काहींनी तिला पुढील प्रवासासाठी 'वंदे भारत' सारख्या हाय-टेक ट्रेनचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. "प्रत्येक गोष्टीबद्दल जास्त विचार करणे थांबवा आणि अनुभवाचा आनंद घ्या," हा मोलाचा संदेश तिने आपल्या कॅप्शनमधून दिला आहे, जो आता अनेक प्रवाशांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.