

Donald Trump Praises England Captain Harry Kane: फिफा विश्वचषक 2026 च्या बाद फेरीतील एका अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने मेक्सिकोचा 3-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. इंग्लंडच्या या थरारक विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्लंडचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर हॅरी केनचे भरभरुन कौतुक केले. ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल'वर सामना संपल्यानंतर एक खास मेसेज पोस्ट केला. यात त्यांनी "इंग्लंडचा हॅरी केन हा एक महान खेळाडू आहे," अशा शब्दांत केनच्या मैदानातील कामगिरीला दाद दिली.
या सामन्यात उत्तरार्धात अँथनी गॉर्डनला डी-बॉक्समध्ये चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आल्यानंतर इंग्लंडला पेनल्टी मिळाली. या सुवर्णसंधीचे सोने करत हॅरी केनने कोणतीही चूक न करता चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. चालू विश्वचषक स्पर्धेतील केनचा हा सहावा गोल ठरला असून, या गोलच्या जोरावर इंग्लंडने सामन्यात मजबूत पकड मिळवली. बायर्न म्युनिककडून खेळणाऱ्या या अनुभवी स्ट्रायकरने केवळ गोलच केला नाही, तर एका गोलसाठी मोलाचा असिस्टही केला.
ऑप्टाच्या आकडेवारीनुसार, केनने 2025-25 च्या चालू हंगामात क्लब आणि देशासाठी मिळून तब्बल 81 गोलमध्ये आपले योगदान दिले, ज्यामध्ये 73 गोल आणि 8 असिस्टचा समावेश आहे.
दुसरीकडे, मिडफिल्डर ज्युड बेलिंगहॅम या सामन्यात इंग्लंडचा खरा हिरो ठरला. त्याने दोन उत्कृष्ट गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आणि 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब पटकावला. यासोबतच त्याने 23 वर्षे 6 दिवस या वयात फिफा विश्वचषकात 10 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू बनण्याचा मान मिळवला आणि अर्जेंटिनाच्या मारिओ केम्पेसचा जुना विक्रम मोडीत काढला. सामन्याच्या 54व्या मिनिटाला डिफेंडर जॅरेल क्वानसाला रेड कार्ड मिळाल्याने इंग्लंडला उर्वरित सामना 10 खेळाडूंसह खेळावा लागला. याचा फायदा घेत मेक्सिकोच्या राऊल जिमेनेझने पेनल्टीद्वारे गोल करुन सामन्यात रंगत आणली.
यजमान मेक्सिकोने (Mexico) शेवटच्या क्षणापर्यंत इंग्लंडवर प्रचंड दबाव आणला, परंतु इंग्लंडच्या बचावफळीने हा दबाव यशस्वीपणे झेलत 3-2 असा विजय निश्चित केला. आता 11 जुलै रोजी मियामी येथे होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इंग्लंडचा सामना नॉर्वेविरुद्ध होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.