Twitter Blue Tick Price: ट्विटरचे नवे बॉस एलन मस्क यांनी आता ट्विटवरवील व्हेरिफाईडअकाऊंटसाठी असलेल्या ब्ल्यू टीक साठी शुल्क आकारणी करायचे ठरवले आहे. मस्क यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यानुसार आता युजर्सना या ब्ल्यु टिकसाठी महिन्याला 8 डॉलर (जवळपास 660 रुपये) मोजावे लागणार आहेत.
तथापि, प्रत्येक देशातील खरेदीची क्षमता लक्षात घेऊन हे शुल्क अॅडजस्ट केले जाईल, असेही मस्क यांनी म्हटले आहे. ट्विटरचा करार पुर्ण केल्यानंतर ब्लू टिकबाबत मस्क यांनी सातत्याने ट्विट केले आहे. सुरवातीला या ब्लू टिकसाठी महिन्याला 20 डॉलर आकारले जाऊ शकतात, अशी चर्चा होती. त्यावरून वाद सुरू झाला होता. सोशल मीडियात कमेंट्सचा पाऊस पडला होता.
मस्क यांनी म्हटले आहे की, ब्ल्यू टीक कुणाकडे आहे, कुणाकडे नाही, याची सध्याची पद्धत सरंजामी आहे. ताकद लोकांच्या हातात असली पाहिजे. आता ब्ल्यू टिकसाठी प्रतिमहिना 8 डॉलर म्हणजे जवळपास 660 रुपये मोजावे लागतील.
शुल्क देणाऱ्यांना हे फायदे
मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर एखादा युजर ब्ल्यू टिकसाठी 8 डॉलर मोजत असेल तर अशा युजरला रिप्लाय, सर्च, मेन्शन यात प्राधान्य दिले जाईल. त्यांना मोठ्या लांबीचे व्हिडिओ आमि ऑडियो पोस्ट करण्याची सुविधा दिली जाईल. जाहीरातीही पुर्वीच्या तुलनेत निम्म्याच असतील. पेवॉलद्वारे पब्लिशर्सना आमच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. ब्ल्यू टिक असलेल्या युजर्सना कंटेट क्रिएट केल्याबद्दल रिवार्डचा महसूलही मिळेल.
आधी ट्विटरवर ब्ल्यू टिक मोफत होती. ब्ल्यू टिकचा अर्थ संबंधित अकाऊंट व्हेरिफाईड आहे, असा होतो. यात सरकार, न्यूज, मनोरंजन किंवा अन्य क्षेत्रातील प्रतिष्ठितांचा समावेश आहे. दरम्यान, मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. टेस्ला, स्पेसएक्स या कंपन्यांचे ते मालक आहेत. त्यांची एकुण संपत्ती 209.1 अब्ज डॉलर इतकी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.