

Donald Trump Iran Warning: मध्यपूर्वेतील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धसदृश कडक इशारा दिला. इराणवरील अमेरिकन नाकेबंदी झुगारुन जे जहाज किंवा नौका अमेरिकन सीमा किंवा नाकेबंदीच्या क्षेत्रात येईल, त्याला त्वरित उद्ध्वस्त केले जाईल, असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांकडे जाणारे सर्व मार्ग रोखण्यासाठी ही लष्करी नाकेबंदी लागू केली असून यामुळे दोन्ही देशात पुन्हा संघर्षाची ठिणगी कधीही पडण्याची शक्यता निर्माण झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवर अत्यंत आक्रमक पोस्ट लिहित इराणच्या नौदलाला पूर्णपणे संपवण्याची भाषा केली. ट्रम्प यांच्या मते, इराणच्या ताफ्यात 'फास्ट अटॅक शिप्स' म्हटल्या जाणाऱ्या 158 वेगवान नौका आहेत, ज्यांचा वापर इराण 'होर्मुज सामुद्रधुनी'मधून जाणाऱ्या मोठ्या जहाजांना लक्ष्य करण्यासाठी करतो. या नौका रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या नियंत्रणाखाली असून त्या अमेरिकन नौदलासाठी डोकेदुखी ठरत होत्या. मात्र, ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, आता अमेरिका या नौकांना कोणताही धोका मानत नाही आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. "इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत," हा ट्रम्प यांचा पुनरुच्चार जगासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.
दुसरीकडे, इराणनेही अमेरिकेची ही लष्करी नाकेबंदी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले असून जशास तसे उत्तर देण्याची घोषणा केली. इराणच्या सशस्त्र दलांचे लष्करी सल्लागार आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सचे माजी कमांडर मोहसेन रेजाई यांनी अमेरिकेला आव्हान दिले की, जर युद्ध झाले तर इराण अशा शस्त्रास्त्रांचा वापर करेल जी जगाने अजून पाहिलेलीही नाहीत. होर्मुज सामुद्रधुनीवर अद्यापही इराणचेच नियंत्रण असून इराणच्या संमतीशिवाय तिथे कोणालाही येता येणार नाही, असा दावा इराणने केला.
इराणच्या (Iran) या आक्रमक पवित्र्यामुळे आणि ट्रम्प यांच्या आदेशामुळे होर्मुजच्या क्षेत्रात 60 टक्क्यांहून अधिक इराणी जहाजे हाय-अलर्टवर आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने या वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली असून ही नाकेबंदी केवळ इराणसाठीच नाही तर जागतिक व्यापार आणि इंधन पुरवठ्यासाठीही घातक ठरु शकते. एका बाजूला अमेरिकेचे (America) लष्करी सामर्थ्य आणि दुसऱ्या बाजूला इराणची प्रत्युत्तर देण्याची जिद्द, यामुळे मध्यपूर्वेतील हे वातावरण कोणत्याही क्षणी मोठ्या युद्धाला निमंत्रण देऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.