

Bangkok Night Pub Fire Accident 2026: थायलंडची राजधानी बँकॉक येथून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. येथील एका नामांकित नाईट पबमध्ये मध्यरात्री भीषण आग लागल्याने तब्बल 27 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर 63 जण गंभीररित्या जखमी झाले. जखमींपैकी 27 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि मृतकांच्या संख्येला अधिकृत दुजोरा दिला.
बँकॉकच्या (Bangkok) गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चतुचक जिल्ह्यातील 'रोंग बिअर ना लाट फ्राओ' नावाच्या प्रसिद्ध नाईट पबमध्ये हा अग्नितांडव घडला. हा पब शहरातील एक अत्यंत लोकप्रिय करमणुकीचे केंद्र मानला जात होता, जिथे लोक वीकेंड आणि आपली संध्याकाळ घालवण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत असत; मात्र ही रात्र या पबसाठी काळ ठरली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पबच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून अचानक धूर निघू लागला आणि पाहता पाहता या धुराने मोठ्या आगीचे रुप धारण केले. मुख्य दरवाजाच आगीच्या विळख्यात सापडल्यामुळे लोकांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नाही. पबमध्ये एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी आणि आगीच्या ज्वाळांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी अनेक लोक पबच्या टॉयलेटमध्ये जाऊन लपले, मात्र हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली.
आग एवढी भीषण होती की, बचाव पथकालाही मुख्य प्रवेशद्वारातून आत जाणे कठीण झाले. अग्निशामक दलाने सुमारे 30 मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आत गेलेल्या बचावकर्त्यांना सर्वाधिक मृतदेह टॉयलेटच्या आत कोंडलेल्या आणि गुदमरलेल्या अवस्थेत आढळले.
थायलंडमध्ये नाईटक्लब आणि पबमध्ये आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2022 मध्ये पूर्व थायलंडमधील एका म्युझिक पबमध्ये लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2009 मध्ये बँकॉकच्या 'सांटिका' नाईटक्लबमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या इनडोअर फटाक्यांच्या शोमुळे 66 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
मात्र या ताज्या दुर्घटनेने थायलंडमधील एंटरटेनमेंट साईट्सच्या फायर सेफ्टी आणि सुरक्षिततेच्या नियमांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बँकॉक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, आग नेमकी कशामुळे लागली आणि ती इतक्या वेगाने कशी पसरली, याचा शोध घेतला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.