

American Journalist Shelly Kittleson Kidnapped Iraq: इराकची राजधानी बगदाद येथून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या आणि पुरस्कार विजेत्या अमेरिकन पत्रकार शेली किटलसन यांचे मंगळवारी भरदिवसा अपहरण करण्यात आले. ही घटना घडली तेव्हा त्या शहरात रिपोर्टिंगचे काम करत होत्या. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांचे अपहरण केल्याने जगात खळबळ उडाली असून इराकच्या गृह मंत्रालयाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेली किटलसन आपल्या कारमधून जात असताना काही सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांचा रस्ता अडवला. या हल्लेखोरांनी त्यांना जबरदस्तीने कारबाहेर खेचले आणि आपल्यासोबत घेऊन पळ काढला. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ स्थानिक माध्यमांच्या हाती लागला असून त्यामध्ये पत्रकार महिलेला बळजबरीने नेले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सुरुवातीला सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांची ओळख उघड करण्यात आली नव्हती, मात्र नंतर विविध रिपोर्ट्सद्वारे अपहृत महिला शेली किटलसन असल्याचे समोर आले.
या घटनेची माहिती मिळताच इराकी सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण बगदाद शहरात नाकेबंदी करुन मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरु केली. तपासादरम्यान एक महत्त्वाची कडी पोलिसांच्या हाती लागली असून अपहरणकर्त्यांनी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांचा पाठलाग सुरु असताना हे वाहन उलटले होते, ज्याचा फायदा घेत काही आरोपी पळून गेले. मात्र, एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. शेली किटलसन या एक अनुभवी फ्रीलान्स पत्रकार असून त्यांनी बीबीसीसह अनेक आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांसाठी काम केले आहे. मध्यपूर्व आशिया आणि अफगाणिस्तान सारख्या युद्धग्रस्त भागांतील धाडसी रिपोर्टिंगसाठी त्या ओळखल्या जातात.
इराकची (Iraq) सुरक्षा व्यवस्था गेल्या काही काळापासून सुधारत असल्याचे मानले जात असतानाच घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. तज्ज्ञांच्या मते, इराकमध्ये अजूनही अनेक असे सशस्त्र गट सक्रिय आहेत जे कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. युद्धजन्य आणि संघर्षग्रस्त भागात पत्रकारांना काम करणे नेहमीच जोखमीचे राहिले आहे. यापूर्वीही अनेक परदेशी पत्रकारांचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे माध्यम प्रतिनिधींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, शेली किटलसन यांची लवकर आणि सुरक्षित सुटका व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव वाढू लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.