

Minneapolis apartment building shooting incident: अमेरिकेतील मियापोलिस शहरात एका उच्चभ्रू अपार्टमेंट इमारतीमध्ये बुधवारी दुपारी घडलेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली. या भीषण घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पोलिसांच्या कारवाईदरम्यान मुख्य संशयित आरोपीचाही मृत्यू झाला. मियापोलिसच्या मध्यवर्ती भागातील 'लोरींग पार्क' परिसराजवळ ही घटना घडली. गोळीबाराची माहिती मिळताच काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचलेल्या सुरक्षा यंत्रणांवरही गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये तीन पोलीस अधिकारी जखमी झाले. सुदैवाने या तिन्ही अधिकाऱ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
पोलिसांना (Police) बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास इमारतीत गोळीबार झाल्याचा कॉल आला. अवघ्या तीन मिनिटांत पोलीस पथक इमारतीत दाखल झाले. मात्र प्रचंड धूर पसरल्याने बचावकार्यात अडथळा आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पीडिताचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याने रुग्णालयात उपचार सुरु असताना दम तोडला. संशयित आरोपीचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हेनेपिन काउंटी मेडिकल सेंटरने एकूण सात जखमींवर उपचार सुरु असल्याचे स्पष्ट केले.
इमारतीमधील प्रत्यक्षदर्शी जुलीयस बेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचा आवाज ऐकू येताच त्यांनी हातात पिस्तूल घेतलेल्या एका व्यक्तीला पाहिले. तो याच इमारतीचा रहिवासी असून वारंवार शस्त्र दाखवून दहशत निर्माण करत असे. तर एक महिला मोठ्याने किंचाळत असल्याचे ऐकताच लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दुसऱ्या एका रहिवाशाने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्याने संशयित आरोपीला हातात पिस्तूल घेऊन फिरताना पाहिले होते आणि त्याची तक्रार अपार्टमेंट प्रशासनाकडे केली होती.
दुसरीकडे, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एफबीआयच्या पथकांनीही घटनास्थळी धाव घेतली. मिनेसोटाचे राज्यपाल टिम वॉल्झ यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत जखमी आणि मृतांच्या कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी अपार्टमेंट टॉवरकडे बंदुका रोखून उभे असल्याचे दिसत आहेत. पोलिसांनी नागरिकांना या दाट लोकवस्तीच्या परिसरात न जाण्याचा इशारा दिला असून या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरु आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.