

AI Model Predicts Cancer Survival Rate: वैद्यकीय क्षेत्रात 'एआय' दररोज नवीन क्रांती घडवत आहे. आतापर्यंत कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारात रुग्णाचा जीव वाचेल की नाही, याचा अंदाज लावण्यासाठी डॉक्टरांना अनेक वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आणि दीर्घकालीन देखरेखीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, 'द लॅन्सेट डिजिटल हेल्थ' या प्रसिद्ध वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनानुसार, आता एआय मॉडेल केवळ कॅन्सर रुग्णाचा चेहरा पाहून तो जगण्याची किती शक्यता आहे, याचा अचूक अंदाज लावू शकणार आहे.
संशोधकांनी या अभ्यासासाठी एआयला तब्बल 4 कोटींहून अधिक सामान्य लोकांचे चेहरे आणि 30 हजारांहून अधिक कॅन्सर रुग्णांच्या फोटोंद्वारे विशेष प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एआयने रुग्णांना त्यांच्या धोक्याच्या पातळीनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले. संशोधनात असे दिसून आले की, ज्या रुग्णांचा रिस्क स्कोर सर्वात जास्त होता, त्यांच्यामध्ये पुढील 90 दिवसांत मृत्यू होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे एआयने अचूक ओळखले.
याशिवाय, एआयने फोटोंच्या आधारे रुग्णांच्या वयाचाही अंदाज लावला, ज्यामध्ये सरासरी चूक अवघी 5 वर्षांची राहिली. एआय प्रामुख्याने नाकाच्या वरचा भाग आणि डोळ्यांखालील भागातील सूक्ष्म बदलांवर लक्ष केंद्रित करुन हे अचूक विश्लेषण करते. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते, तेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे आणि अवयव नीट काम करत नसल्यामुळे चेहऱ्याची त्वचा, रंग आणि सूज यामध्ये फरक पडतो, ज्याचा थेट अंदाज एआय घेते.
जरी ही तंत्रज्ञान प्रणाली अजून प्रत्यक्ष वैद्यकीय वापरासाठी पूर्णपणे तयार नसली आणि डॉक्टरांच्या सध्याच्या तपासणी पद्धतींपेक्षा काही अतिरिक्त माहिती देते का, हे सिद्ध होणे बाकी असले, तरी भविष्यात डॉक्टरांना अचूक निर्णय घेण्यासाठी ही एआय प्रणाली एक महत्त्वाचा साहाय्यक संकेत म्हणून नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.