
काबूल: अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात रविवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपात ८०० जणांचा मृत्यू झाला असून, २५०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर सहा होती, असे तालिबान सरकारने आज सांगितले. या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली आहेत, भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने मोठ्या प्रमाणावर साहित्य पाठवले आहे.
भूकंपाचा सर्वाधिक फटका कुनार प्रांतातील शहरांना बसला. हा भाग नंगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळ आहे.
अमेरिकी जिऑलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता झालेल्या या भूकंपाचे केंद्र नंगरहार प्रांतातील जलालाबाद शहराच्या ईशान्येस २७ किलोमीटर अंतरावर आणि केवळ ८ किलोमीटर खोलीवर होते. या भूकंपनंतर छोटे धक्केही बसले आहेत. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकासान झाले आहे.
कुनारमधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या भूकंपाबाबत माहिती दिली आहे. नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये नूर गुल, सोकी, वाटपूर, मानोगी आणि चापादरे यांचा समावेश आहे. तेथील शेकडो घरांचे नुकसान झाले आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, फक्त कुनार गावातच किमान ४० पेक्षा अधिक मृत्यू झाले असून, १०० जण जखमी झाले आहेत. विखुरलेल्या वस्त्यांमध्ये झालेल्या नुकसानाची अचूक आकडेवारी गोळा करण्यासाठी अजून वेळ लागणार आहे.
‘‘मृतांची आणि जखमींची संख्या मोठी आहे, पण या भागात पोहोचणे अवघड असल्याने सरकारचे प्रतिनिधी घटनास्थळी आहेत,’’ असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शाराफत झमान यांनी निवेदनात सांगितले.
शेकडो जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे या प्रांताचे माहिती प्रमुख नजीबुल्लाह हनीफ यांनी सांगितले. रस्ते कमी प्रमाणात असलेल्या दुर्गम भागातून माहिती मिळेल त्यानुसार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाच्या सीमेला लागून असलेल्या भागात भूकंपानंतर अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानात नेहमी भूकंप होत असतात, विशेषतः हिंदुकुश पर्तवरांगांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षभरात पश्चिम अफगाणिस्तानात झालेल्या झालेल्या भूकंपांमध्ये १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान भारताच्या वतीने अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांसाठी मदत पाठवली आहे.
कुनारमधील सर्वाधिक प्रभावित भागांपैकी एक असलेल्या नुरगल जिल्ह्यातील एका रहिवाशाने सांगितले की, जवळजवळ संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले आहे. मुले, वृद्ध, तरुण ढिगाऱ्याखाली आहेत. आम्हाला इथे मदतीची गरज आहे. नुरगलच्या मझा दारा भागात राहणाऱ्या सादिकुल्लाहने सांगितले की, माझी मुले जिथे झोपली होती तिथे मी धाव घेतली आणि त्यापैकी तिघांना वाचवले आणि तातडीने घराबाहेर पडलो. ‘‘माझे संपूर्ण घर भूकंपात उद्ध्वस्त झाले,’’ असे तो म्हणाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.