Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात सातत्याने हल्ले सुरु आहेत. शनिवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला. पॅलेस्टिनी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, ओल्ड गाझा स्ट्रीटमधील जबलिया येथील दोन घरांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये सुमारे 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय जबलियामध्येच आणखी एका घरावर झालेल्या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेले आहेत. अमेरिकेने इस्रायलला हल्ले कमी करुन केवळ हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यास सांगितले असताना हे सर्व घडले आहे.
पॅलेस्टिनी एजन्सींच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांनंतर मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. त्याचवेळी, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांच्या सैन्याने गाझामधील दोन शाळांमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना ठार केले. याशिवाय, खान युनिस येथील शस्त्रांनी भरलेल्या अपार्टमेंटवर छापा टाकण्यात आला. अमेरिकेने इस्रायलला इशारा दिला असतानाच हे हल्ले झाले आहेत. अमेरिकेने म्हटले होते की, अंदाधुंद हवाई हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूमुळे इस्रायलला आंतरराष्ट्रीय पाठिंबा गमवावा लागू शकतो. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी इस्रायलला भेट दिली. त्यांनी इस्रायलला आपल्या व्यापक लष्करी कारवाया कमी करण्याचे आणि हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणारे हल्ले सुरु ठेवण्याचे आवाहन केले.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने सांगितले की, त्यांनी गाझा पट्टीच्या शेजैया जिल्ह्यात तीन ओलिसांना धोका मानून त्यांची हत्या केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. ओलिसांच्या अपघाती हत्येनंतर तेल अवीवच्या कपलान जंक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिली की, "प्रत्येक ओलिसांची सुटका होईपर्यंत विजय होणार नाही" टाइम्स ऑफ इस्रायलने वृत्त दिले. दरम्यान, इस्रायल-हमास युद्धातील मृतांची संख्या 18,787 झाली आहे. हमासच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.