

IFJ Report 2025: अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेसाठी 2025 हे वर्ष अत्यंत भीषण आणि रक्तरंजित ठरले. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या वार्षिक अहवालात अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली. 2025 या एका वर्षात जगभरात तब्बल 128 पत्रकार आणि प्रसारमाध्यम कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. या अहवालाने जागतिक स्तरावर पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला.
IFJ च्या अहवालानुसार, मध्य पूर्व आणि अरब देश हे पत्रकारांसाठी जगातील सर्वात धोकादायक ठिकाणे ठरली आहेत. या भागात सर्वाधिक 74 पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. विशेषतः इस्रायल-हमास युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी गाझा हे मृत्यूचे सापळा बनले होते. एकट्या गाझामध्ये 56 पत्रकारांची हत्या झाली. 10 ऑगस्ट 2025 रोजी अल जजीराचे पत्रकार 'अल-शरीफ' यांच्यावर झालेला हल्ला या वर्षातील सर्वात अंगावर काटा आणणारा ठरला. गाझाच्या अल शिफा रुग्णालयाबाहेर असलेल्या कॅम्पमध्ये अल-शरीफ यांच्यासह 5 पत्रकारांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले.
केवळ युद्धजन्य परिस्थितीच नाही, तर इतर कारणांमुळेही पत्रकारांना लक्ष्य केले गेले. अहवालानुसार, 2025 मध्ये यमनमध्ये 13, युक्रेनमध्ये 8 आणि सुदानमध्ये 6 पत्रकारांचा मृत्यू झाला. आशियाई देशांमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. भारत आणि पेरुमध्ये प्रत्येकी 4 पत्रकारांची हत्या झाली, तर शेजारील देश पाकिस्तान आणि फिलीपीन्समध्ये प्रत्येकी 3 पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. या एकूण मृतांमध्ये 10 महिला पत्रकारांचा समावेश आहे, तर 9 पत्रकारांचा मृत्यू ड्युटीवर असताना झालेल्या अपघातांमुळे झाला.
केवळ हत्याच नाही, तर पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना तुरुंगात टाकण्याचे प्रमाणही वाढले. सध्या जगभरात 533 पत्रकार तुरुंगात बंद आहेत. आशिया पॅसिफिक क्षेत्रात ही संख्या सर्वाधिक 277 इतकी आहे. यामध्ये चीनमध्ये सर्वाधिक 143, म्यानमारमध्ये 49 आणि व्हिएतनाममध्ये 37 पत्रकारांना कैदेत ठेवण्यात आले. 1990 पासून IFJ ने ही यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून आतापर्यंत एकूण 3173 पत्रकारांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
IFJ चे सरचिटणीस अँथनी बेलेंजर यांनी या आकडेवारीवर तीव्र चिंता व्यक्त केली. "हे केवळ पत्रकारांचे मृत्यू नाहीत, तर ही जगातील माहितीच्या स्वातंत्र्यावर झालेली गदा आहे. हे जागतिक लोकशाहीसाठी मोठे संकट आहे," असे त्यांनी म्हटले. त्यांनी जगातील सर्व सरकारांना आवाहन केले की, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही आंच येऊ देऊ नका आणि मीडिया कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करा. तसेच, पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना मिळणारी मोकळीक (Impunity) त्वरित संपवण्याची मागणीही त्यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.