

Women World Cup 2025 Final, India vs South Africa
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा भव्य अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या (२ नोव्हेंबर) नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे, कारण दोघेही पहिल्यांदाच विश्वविजेतेपदासाठी भिडणार आहेत.
भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या विजयामुळे भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आता पहिल्या एकदिवसीय विश्वचषक विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका देखील पहिलं विजेतेपद मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
डीवाय पाटील स्टेडियममध्ये शनिवारी तिकीट काउंटरवर चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. काही जण ३६ तासांपेक्षा जास्त वेळ रांगेत थांबले होते. ऑनलाइन तिकिटे पूर्णपणे विकली गेली असून काही तिकिटे व्हायागोगो (Viagogo) सारख्या वेबसाइटवर ₹६,५०० ते तब्बल ₹१.३ लाखांपर्यंत विकली जात आहेत. व्हीआयपी बीएल१ विभागातील एका तिकिटाची किंमत ₹१३६,१८७ एवढी असून दोन तिकिटांसाठी ₹२.७२ लाखांपर्यंत दर पोहोचले आहेत.
दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारीनुसार भारताचा स्पष्ट वरचष्मा दिसून येतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान आतापर्यंत एकूण ३४ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने २० सामने जिंकले, तर दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे इतिहास भारताच्या बाजूने असला तरी अंतिम फेरीत दबाव दोन्ही संघांवर तितकाच असेल.
भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.
दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, अँनेरी डिर्कसेन, अँनेके बॉश, मॅरिझाने कॅप, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा.
दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी फॉर्मात असल्याने हा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. भारतीय संघाच्या चाहत्यांना हरमनप्रीत, स्मृती आणि दीप्तीच्या कामगिरीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तर मॅरिझाने कॅप आणि लॉरा वोल्वार्ड यांच्या खेळीवर आफ्रिकन संघाचा विजय अवलंबून असेल. उद्या नवी मुंबईत विश्वचषकाची ही अंतिम लढत रंगणार असून, संपूर्ण देशाचे लक्ष “ब्लू ब्रिगेड”कडे लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.