

India vs South Africa ICC Women's World Cup final 2025
रविवार, २ नोव्हेंबर रोजी आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या विजेतेपदाच्या सामन्याचा दिवस आहे. या ऐतिहासिक लढतीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका महिला संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम या थरारक सामन्याचे साक्षीदार ठरणार आहे. संपूर्ण देशाच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत, कारण महिला क्रिकेटला आज नवीन विश्वविजेतेपदाचा मुकुट मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्ड हिने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तिने सांगितले की, भारतीय संघावर घरच्या मैदानाचा दबाव असेल आणि त्याचा परिणाम सामन्यात दिसू शकतो.
आयसीसीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर लॉरा वोल्वार्डचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात ती म्हणाली, “मला वाटते की हा सामना खूप कठीण असणार आहे. संपूर्ण प्रेक्षक भारताला पाठिंबा देतील आणि स्टेडियम खचाखच भरलेले असेल. त्यामुळे वातावरण खूप रोमांचक असेल, पण त्याच वेळी मला वाटते की हा दबाव भारतावर येईल. संपूर्ण देश त्यांच्या मागे आहे आणि सर्वजण भारताच्या विजयाची अपेक्षा करत आहेत. त्यामुळे ते आमच्या बाजूने काम करू शकते.”तिने पुढे सांगितले,
“मी या सामन्यासाठी खूप उत्सुक आहे. भारत एक अतिशय सक्षम संघ आहे आणि त्यांना हरवण्यासाठी आम्हाला उत्कृष्ट क्रिकेट खेळावे लागेल. आमच्या संघाने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि मला या मुलींचा खूप अभिमान आहे. आम्ही आमच्या देशातही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना महिला क्रिकेटकडे आकर्षित करण्यात यशस्वी झालो आहोत. या विश्वचषकाने महिला क्रिकेटला नवी ओळख मिळवून दिली आहे.”
दरम्यान, भारतीय संघाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर प्रभावी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दोन्ही संघांची फॉर्म सध्या जबरदस्त आहे, त्यामुळे आजचा सामना हा केवळ विश्वविजेतेपदासाठीच नाही तर महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा सामना ठरण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.