Presidential Candidate: निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींच्या निवडणुकीची तारीख आधीच जाहीर केली आहे. सत्ताधारी पक्ष म्हणजेच एनडीएकडून लवकरच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल. परंतु विरोधी पक्षही राष्ट्रपतीपदाचा उमेदवार उभा करणार की एनडीएच्या उमेदवारावरच एकमत होणार का, हा प्रश्न आहे.
गुलाम नबी आझाद यांचे नाव समोर आले
काँग्रेसच्या (Congress) एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर विरोधी पक्षांमध्ये एकमत घडवण्याचा पक्ष प्रयत्न करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षात राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या नावावर चर्चा सुरु झाली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या नावाने विरोधी पक्षांमध्ये मतैक्य निर्माण करणे सोपे जाईल, असे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. कारण आझाद हे दीर्घकाळ राज्यसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. विरोधी पक्षनेत्यांशीही त्यांचे उत्तम संबंध आहेत. मात्र हे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक विरोधी पक्ष जोरदारपणे लढू शकतात
काँग्रेसच्या नावावर विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले नाही, तर टीएमसीकडूनही विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे नाव येऊ शकते. त्या नावावर इतर विरोधी पक्षांचे एकमत झाले तर काँग्रेस पक्षही त्याला पाठिंबा देऊ शकतो. अशा स्थितीत राष्ट्रपतीपदाची निवडणूक विरोधक जोरदारपणे लढतील, असे काँग्रेस पक्षाला वाटत आहे.
दुसरीकडे, काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचा दावा आहे की, एनडीएकडे 48.5% मते आहेत, तर एनडीएत नसलेल्या पक्षांची संख्या 51.5% आहे. फक्त यूपीए पक्षांची मते 24 ते 25 टक्के आहेत. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आल्यास हा आकडा 47 टक्क्यांच्या जवळपास पोहोचतो.
काँग्रेस नेत्याच्या म्हणण्यानुसार, बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसच्या भूमिकेवर सर्व काही अवलंबून असेल. कारण या दोन्ही पक्षांचे मत जवळपास 4% आहे. जे सर्व विरोधी पक्ष एकत्र राहिले तर ते जिंकू शकतात आणि ते मत एनडीएला गेले तर त्यांच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे.
तसेच, काँग्रेस नेत्यांना बीजेडी आणि वायएसआरकडून पाठिंबा मिळण्याची फारशी आशा नाही कारण या दोघांच्या नेत्यांनी अलीकडेच पंतप्रधानांची भेट घेतली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.