

सोशल मीडियावर दररोज अनेक मजेशीर आणि थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही, तर काही प्रसंग पाहताना अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो. सध्या असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. एका ज्येष्ठ व्यक्तीने चक्क विषारी कोब्राला पकडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारात त्यांची झालेली धावपळ, अचानक घसरणे आणि अखेरीस कोब्राला ड्रममध्ये बंद केल्यानंतर केलेला आनंद पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इन्स्टाग्रामवरील @amar2431singh या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात हा प्रकार घडल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. अंगणात एक भला मोठा कोब्रा फणा काढून उभा असतो. त्याच्याजवळच एक निळ्या रंगाचा ड्रम ठेवलेला असतो. या वेळी एक ज्येष्ठ व्यक्ती हातात लांब काठी घेऊन सापाला ड्रमच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
काठीच्या साहाय्याने कोब्राला ड्रममध्ये घालण्याचा प्रयत्न सुरू असताना साप वारंवार फणा उगारतो आणि वेगवेगळ्या दिशांना सरकतो. त्यामुळे हा प्रसंग अधिकच थरारक बनतो. आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांच्या हसण्याचे आणि ओरडण्याचे आवाजही ऐकू येतात. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय 'नागिन'ची धून वाजत असल्याने व्हिडीओला एक वेगळाच नाट्यमय रंग मिळाला आहे.
कोब्राला ड्रममध्ये कोंडण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक आजोबांचा पाय घसरतो आणि ते पाठीवर पडतात. हा क्षण पाहून उपस्थित लोकांची एकच हशा पिकतो. मात्र, खाली पडल्यानंतरही ते ड्रम सोडत नाहीत. जमिनीवर पडलेल्या अवस्थेतच ते ड्रम सावरण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर कसाबसा ड्रम सरळ करून त्यात कोब्राला बंद करण्यात यश मिळाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
ड्रममध्ये कोब्रा बंद झाल्यानंतर या ज्येष्ठ व्यक्तींचा आनंद पाहण्यासारखा आहे. एखादी मोठी लढाई जिंकल्याप्रमाणे ते उत्साहाने उड्या मारताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे व्हिडीओ पाहणाऱ्यांनाही हसू आवरत नाही. काही क्षणांपूर्वी जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जाणारी व्यक्ती साप ड्रममध्ये बंद होताच आनंदाने नाचू लागते, हा विरोधाभास नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका नेटकऱ्याने मजेशीर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "कोब्राचा एक किस मिळाला असता तर चचा तिथेच संपले असते!" तर काहींनी आजोबांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. 'नागिन'च्या गाण्यामुळे हा व्हिडीओ आणखी मनोरंजक झाल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.
मात्र, काही नेटकऱ्यांनी या प्रकाराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कोब्रा हा अत्यंत विषारी साप असून त्याच्या दंशामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केवळ मनोरंजन किंवा धाडस दाखवण्यासाठी अशा प्रकारचे स्टंट करणे टाळावे. साप आढळल्यास त्याला स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्र किंवा संबंधित वनविभागाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. व्हिडीओ मजेशीर वाटत असला, तरी त्यामागचा धोका दुर्लक्षित करता येणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.