

आजच्या आधुनिक आणि वेगवान कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी घेणे हा केवळ कामातून विरंगुळा राहिलेला नाही, तर तो एक मानसिक ताण आणि भीतीचा विषय बनला आहे. हक्काची सुट्टी मंजूर झाल्यानंतरही अनेक कर्मचाऱ्यांना आपण काहीतरी मोठा गुन्हा केला आहे, असा विनाकारण अपराधबोध (Guilt) सतावतो. याच 'टॉक्सिक वर्क कल्चर'वर (Toxic Work Culture) बोट ठेवत 'माहीर' नावाच्या एका महिला कंटेंट क्रिएटरने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओने कॉर्पोरेट विश्वातील अशा एका कडू सत्याला वाचा फोडली आहे, ज्याचा सामना दररोज लाखो नोकरदार करत आहेत.
हा संपूर्ण प्रकार तेव्हा सुरू झाला, जेव्हा माहीरने बकरीदच्या निमित्ताने ऑफिसमधून छोटी सुट्टी घेण्याचा आपला वैयक्तिक अनुभव इंटरनेटवर शेअर केला. तिने सांगितले की, सुट्टीवर जाण्यापूर्वी तिने तिचे सर्व प्रलंबित काम वेळेच्या आधीच पूर्ण केले होते, तरीही तिच्या मनावर ऑफिसचा एक न दिसणारा मानसिक दबाव सातत्याने जाणवत होता.
व्हिडिओमध्ये ती म्हणते, "कॉर्पोरेटमध्ये काम करताना सुट्टी घेतल्यावर इतका गिल्ट का वाटतो? मी ईदच्या तिसऱ्या दिवशी 'पेड लीव्ह' (Paid Leave) घेत आहे. विशेष म्हणजे माझे सगळे काम मी आधीच संपवले आहे. मी गायब होत नाहीये, फक्त माझ्या हक्काच्या शिल्लक सुट्ट्या वापरत आहे. तरीही माझ्या मनात एक भीती का आहे?"
माहीरने पुढे स्पष्ट केले की, ही केवळ तिची एकटीची व्यथा नाही, तर प्रत्येक त्या कर्मचाऱ्याची कहाणी आहे ज्याला सुट्टी मिळवण्यासाठी आपल्या बॉसला एखाद्या गुन्हेगारासारखे स्पष्टीकरण देणारे लांबलचक ई-मेल लिहावे लागतात. सुट्टीसाठी स्वतःला प्रमाणाबाहेर सिद्ध करणे किंवा स्पष्टीकरण देणे हीच या वर्क कल्चरमधील सर्वात मोठी त्रुटी आहे.
सुट्टी घेण्याचा अर्थ असा होत नाही की तो कर्मचारी कामचोर आहे किंवा त्याला स्वतःच्या करिअरची काळजी नाही. "माझे संपूर्ण अस्तित्व केवळ कंपनीच्या 'प्रॉडक्टिव्हिटी'भोवतीच फिरू शकत नाही. आराम करण्याचा अधिकार हा कमावण्याचा नसून तो आपला मूळ हक्क आहे, जणू काही तो एखादा अवॉर्ड असल्यासारखे वागवले जाते," असे माहीरने ठणकावून सांगितले.
हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट सेक्शनमध्ये कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या भावनांचा पूर आला आहे. एका युझरने लिहिले, "जेव्हा जेव्हा मी सुट्टी मागतो, तेव्हा मला घरची पूर्ण कहाणी सांगावी लागते. एवढे स्पष्टीकरण देऊन आता थकलो आहे." दुसऱ्या एका युझरने संताप व्यक्त करत लिहिले, "पेड लीव्ह आमचा हक्क आहे, कंपनी आमच्यावर कोणतेही उपकार करत नाही, कारण हा आमच्या सीटीसीचा (CTC) हिस्सा असतो."
काही युझर्सनी तर त्यांच्या 'खडूस' मॅनेजर्सचे धक्कादायक अनुभव शेअर केले. एकाने सांगितले की, जेव्हा त्याने सुट्टी मागितली, तेव्हा मॅनेजर म्हणाला, 'हे काम तू वीकेंडलाही करू शकला असता, मग सुट्टी कशाला हवी?' म्हणजे वीकेंड आणि वर्किंग डेज दोन्हीवर कंपन्या आपला हक्क दाखवतात, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.